राज्यातील एक हजार संस्थांची चौकशी
By admin | Published: April 14, 2015 01:26 AM2015-04-14T01:26:18+5:302015-04-14T01:26:18+5:30
राज्यातील एक हजारांवर सहकारी संस्था, बाजार समित्यांच्या चौकशीची तयारी शासनाने केली आहे. निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत ही चौकशी होणार आहे.
सांगली : राज्यातील एक हजारांवर सहकारी संस्था, बाजार समित्यांच्या चौकशीची तयारी शासनाने केली आहे. निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत ही चौकशी होणार आहे. सहकारी संस्था व बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर चौकशी प्रक्रियेस सुरुवात होईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले की, गैरव्यवहार झाल्याची शक्यता असलेल्या सुमारे एक हजार संस्था राज्यात आहेत. त्यात काही कृषी बाजार समित्याही आहेत. बाजार समित्यांच्या ‘सेस’च्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांचीही चौकशी झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी दिली, तर ती रेंगाळण्याची शक्यता असते. यासाठी निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल. ही समिती त्यांचा अहवाल सरकारला देईल.
टोल संदर्भात ते म्हणाले की, दोनशे कोटींपेक्षा कमी खर्चाचे प्रकल्प शासनाकडून केले जातील. (प्रतिनिधी)
...तर कारखान्यांवर कारवाई
खरेदी कर माफ करणे, निर्यातीवर अनुदान असे उपाय करतानाच शासनाने साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्यांना दोन हजार कोटींचे पॅकेज दिले. यानंतरही ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला.