कोयनेतून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी
By admin | Published: May 1, 2016 01:02 AM2016-05-01T01:02:36+5:302016-05-01T01:02:36+5:30
कोयना धरणातून कर्नाटकसाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे पाण्याची मागणी
सातारा : कोयना धरणातून कर्नाटकसाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली.
तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे पाण्याची मागणी केली होती. २८ एप्रिलपर्यंत कोयना धरणाच्या रिझर्व्ह गेटमधून एक टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्यानंतरही कर्नाटकने अजून एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. त्यावर विचार करून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करत शुक्रवारी (दि. २९) रात्री अकरा वाजता पाणी सोडण्यास प्रारंभ केला. पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक आणि गेटमधून १८५० क्युसेक असे ३,९६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून कर्नाटक व सांगलीसाठी सुरू आहे. (प्रतिनिधी)
पाणी देऊ नका
- शंभूराजे देसाई
कोयना धरणात सध्या २६ टीएमसी पाणीसाठा आहे. कर्नाटकने अशीच मागणी कायम ठेवली तर महिनाभर पाणी कसे पुरणार, ही चिंता सतावू लागली आहे. ‘यापुढे कोयनेतून कर्नाटकला पाणी देऊ नये,’ अशी भूमिका आमदार शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे.