शिक्षक बनण्यासाठी इच्छुक दीड लाखांवर उमेदवार राहणार बेकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:31 AM2018-12-22T04:31:06+5:302018-12-22T04:31:31+5:30
डीएड, बीएड केले म्हणजे शिक्षक झालो असे वाटते. मात्र आता हा विचार बदलावा लागेल. भारत देश सध्या विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करीत आहे.
रत्नागिरी : डीएड, बीएड केले म्हणजे शिक्षक झालो असे वाटते. मात्र आता हा विचार बदलावा लागेल. भारत देश सध्या विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याची आवड, त्यांना घडविण्याची असेल अशाच मंडळींना संधी आहे. शासनाच्या पवित्र पोर्टलवर १ लाख ७८ हजार विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र आता होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये केवळ १८ ते २० हजार उमेदवारांनाच नोकरी मिळणार आहे. उर्वरित एक लाख ५८ हजार शिक्षकांना नोकºया मिळणार नाहीत, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती, त्यातील बदल याबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात थेट संवाद आयोजित केला होता. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील ४६ महाविद्यालयातील ४५०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तावडे यांनी उत्तरे दिली.
खेळाडूंसाठी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असून क्रिडा, कला प्रकाराची आवड असणाºया विद्यार्थ्यांसाठी ओपन बोर्ड सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीएडचा अभ्यासक्रम शंभर टक्के कालबाह्य असून केंद्रीय मनुष्यबळ खात्याला विकसित शिक्षक घडविणारा शिक्षक तयार करण्याचा अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना करण्यात येईल. परेदशात ३० लाख रूपये खर्च करून शिकण्यापेक्षा भारतात १० लाखात शिकता येईल, यासाठी परदेशी विद्यापीठांशी समन्वय करून स्काईपव्दारे लेक्चर देण्याचा प्रयत्न राहिल. आतापर्यत ६५ विद्यापिठांशी टायप करण्यात आले आहे. बाहेरच्या ३८ विद्यापिठात आपले अभ्यासक्रम शिकविले जात असून इस्त्रायलमध्ये मराठी शिकविण्यासाठी आपल्याकडील प्राध्यापक जात असल्याचे त्यांनी सांगितले.