एक लाख महिला प्रवाशांमागे एक महिला आरपीएफ
By admin | Published: April 3, 2017 02:42 AM2017-04-03T02:42:32+5:302017-04-03T02:42:32+5:30
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा उपाय केले जात असतानाच, प्रत्यक्षात मात्र आरपीएफची (रेल्वे सुरक्षा दल) सुरक्षा तोकडीच पडताना दिसते.
मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा उपाय केले जात असतानाच, प्रत्यक्षात मात्र आरपीएफची (रेल्वे सुरक्षा दल) सुरक्षा तोकडीच पडताना दिसते. पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून दिवसाला लाखोंच्या संख्येने महिला प्रवासी प्रवास करतात. या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे आरपीएफच्या महिला जवानही आहेत, परंतु महिला आरपीएफचे मनुष्यबळ फारच कमी असून, एक ते सव्वा लाख महिला प्रवाशांमागे एक महिला आरपीएफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे १५४ महिला होमगार्ड देण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून तयार करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून दिवसाला जवळपास ४0 लाख प्रवासी प्रवास करतात. यात १२ लाख महिला प्रवाशांचा समावेश आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात लोहमार्ग पोलिसांची (जीआरपी) सुरक्षा देण्यात आली आहे, तर स्थानकांवरही लोहमार्ग पोलिसांबरोबरच आरपीएफचे जवानही तैनात असतात. मात्र, प्रवास करताना महिला प्रवाशांची होणारी छेडछाड, विनयभंग, मारहाण पाहता, रेल्वेकडून सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेकडून तर लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसवतानाच, आपत्कालीन परिस्थितीत लोकलच्या गार्डशी संपर्क साधता यावा, यासाठी टॉक बॅक यंत्रणाही बसवण्यात आली. या उपाययोजना केल्या जात असल्या, तरी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या महिला आरपीएफ जवानच पश्चिम रेल्वेवर कमी पडत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पश्चिम रेल्वे आरपीएफकडे अवघ्या ९९ महिला जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत. महिला प्रवाशांची संख्या पाहता, एक ते सव्वा लाख महिला प्रवाशांमागे एकच जवान अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे महिला होमगार्ड मिळावेत, अशी मागणी पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून केली जात असून, तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४00 महिला होमगार्डची गरज होती. परंतु रेल्वे प्रशासनाने एवढी गरज नसल्याचे सांगून, आरपीएफला पुन्हा त्याचा अभ्यास करण्यास सांगितले. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर, १५४ महिला होमगार्डचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. रेल्वेच्या मुख्यालयाकडून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच, तो राज्याच्या होमगार्ड विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
लोकलच्या महिला डब्यात मोठ्या प्रमाणात पुरुष प्रवाशांचीही घुसखोरी होते. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी केल्याच्या वर्षाला १0 हजारांपेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत असते. २0१५ मध्ये बलात्काराच्या ५, तर विनयभंगाच्या ८९ केसेसची नोंद होती. २0१६ मध्ये ८ केसेस बलात्काराच्या, तर विनयभंगाच्या ६९ केसेसची नोंद झाली आहे.