ओएनजीसीवर प्रकल्पग्रस्तांची धडक

By admin | Published: July 12, 2017 02:42 AM2017-07-12T02:42:30+5:302017-07-12T02:42:30+5:30

प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (१० जुलै) प्रकल्पाच्या मुख्यालयालाच धडक देऊन आपला संताप व्यक्त केला.

ONGC strikes project collapses | ओएनजीसीवर प्रकल्पग्रस्तांची धडक

ओएनजीसीवर प्रकल्पग्रस्तांची धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पात चौथ्या श्रेणीतील हाउसकिपिंगच्या कामातही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यास प्रशासनाने नकार दिल्याने, संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (१० जुलै) प्रकल्पाच्या मुख्यालयालाच धडक देऊन आपला संताप व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे नमते घेतलेल्या ओएनजीसी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
नागाव, म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीच्या वतीने उरण ओएनजीसीच्या मुख्यालयासमोरील अप्पू गेटवर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार निदर्शने केली. सुमारे ९०० एकर भातशेतीवर उभारण्यात आलेल्या ओएनजीसीच्या एलपीजी प्रकल्पात हाउसकिपिंगच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. या कामात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची मागणी नागाव, म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतींनी केली होती. स्थानिक आमदार मनोहर भोईर, भाजपा नेते महेश बालदी यांनीही याबाबत ग्रामपंचायतींच्या वतीने पाठपुरावा केला होता. प्रकल्पात साखरखार मजूर सोसायटीला मिळालेल्या कामात स्थानिक ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या नावाच्या यादीतून कामगार भरती करण्याचे आश्वासन ओएनजीसीचे ग्रुप जनरल मॅनेजर हसन यांनी दिले होते. प्रत्यक्षात काम सुरू करताना ठेकेदाराने ओएनजीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासून स्थानिकांना डावलून कामगारांची भरती केली. यामुळे तिन्ही ग्रामपंचायती मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
ओएनजीसी प्रशासनाकडे विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामपंचायतींना दिलेल्या आश्वासनाबाबत अधिकाऱ्यांनी हात वर केले. यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी प्रकल्पाच्या मुख्यालयात धडक देऊन आपला संताप व्यक्त केला. उरण ओएनजीसीच्या मुख्यालयासमोरील अप्पू गेटवर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार निदर्शने केली.
याप्रसंगी उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, नागाव, चाणजे, म्हातवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सुमारे ५०० प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: ONGC strikes project collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.