कांदा-बटाटे व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम
By admin | Published: July 16, 2016 03:12 AM2016-07-16T03:12:57+5:302016-07-16T03:12:57+5:30
सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी
नाशिक : सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी, कांदा, बटाटा संघटनेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा व बटाट्याचे व्यवहार ठप्प आहेत.
शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची तातडीची बैठक होऊन त्यात मंगळवारी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी नियमन मुक्तीनंतर येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्याचा निर्णय झाला. बाजार समितीच्या आत एक आणि बाजार समितीच्या बाहेर दुसरा कायदा, हा नियम व्यापारी व आडत्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड हजार आडते व व्यापाऱ्यांनी त्यांचे परवाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे परत करून लिलावात सहभागी न होणार असल्याचे कळविले आहे, असे बाजार समित्यांच्या सभापतींनी स्पष्ट केले.
रविवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यास बाजार समित्यांचे सभापतीही उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)