कांद्याचे आजपासून लिलाव, मुख्यमंत्री करणार केंद्र सरकारसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:21 IST2020-10-30T05:34:09+5:302020-10-30T07:21:43+5:30
Onion News : कांदाप्रश्नी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार विनायक राऊत, प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कांदा उत्पादक तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कांद्याचे आजपासून लिलाव, मुख्यमंत्री करणार केंद्र सरकारसोबत चर्चा
मुंबई : निर्यात बंदी आणि साठवणूक मर्यादेविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव ठप्प होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी वर्षा निवासस्थानी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून कांद्याचा लिलाव सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.
कांदाप्रश्नी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार विनायक राऊत, प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कांदा उत्पादक तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री स्वतः केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याची माहिती कृषी मंत्री भुसे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यात यावा. कांद्याबाबत कायमस्वरूपी धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तशा शिफारशी कराव्यात अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती कांदा व्यापारी संघटनेचे नंदकुमार डागा यांनी दिली.