कांदा पुन्हा चढणार काट्यावर, आजपासून लिलाव सुरू; आश्वासनानंतर व्यापाऱ्यांचा बंद मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:28 AM2023-08-24T09:28:56+5:302023-08-24T09:29:41+5:30
व्यापाऱ्यांची भूमिका केंद्राकडे मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून, गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी केले जाणार नाही, तोपर्यंत विरोध कायम राहणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली.
कांद्याच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले असून, व्यापारी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी भूमिका मांडली. नाफेडचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
व्यापाऱ्यांची भूमिका केंद्राकडे मांडणार
कांदा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिले.
कुठे काय झाले...
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाेरदार आंदाेलन केले.
- अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका काँग्रेसने कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यात शुल्क वाढीचा निषेध केला आणि घोषणाबाजी केली.
- हिंगोलीत स्वाभिमानी संघटनेने गोरेगाव येथे कांदे जाळून निषेध केला. तुळजापूर (जि. धाराशिव) येथे कांदा निर्यात कर अध्यादेशाची होळी करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.
- खंडू देवरे, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन
कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत काॅंग्रेससह विराेधी पक्षांचा संघर्ष सुरूच राहील.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष