कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:15 AM2023-11-03T10:15:38+5:302023-11-03T10:15:58+5:30
बाजार समितीत २८ ते ४८ रुपये; प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये दर ३० ते ५४ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ४८ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये दर ८० ते १०० रुपयांवरून ६० ते ७५ रुपये झाले आहेत. राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रतिदिन चढउतार होऊ लागले आहेत. दर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर ग्राहकांची चिंता वाढली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा दर घसरू लागल्यामुळे ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी मुंबई बाजार समितीत ७६१ टन कांद्याची आवक झाली असून, २८ ते ४८ रुपये किलो दराने तो विकला गेला. प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले.
डिसेंबरपर्यंत चढउतार
डिसेंबरमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होईल. तोपर्यंत बाजारभावामध्ये चढउतार सुरू राहील. भाव काही प्रमाणात कमी झाले असले तरी पुन्हा दर वाढू शकतात, अशी शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
किरकोळ मार्केटमध्येही दर कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपये किलोदराने कांद्याची विक्री होत होती. गुरुवारी हे दर ६० ते ७५ रुपयांवर आले आहेत.