बंगळुरूला कांदा नेणाऱ्या शेतकऱ्यांची झाली परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:46 AM2019-01-15T06:46:42+5:302019-01-15T06:47:03+5:30
आतबट्ट्याचा व्यवहार : परतीच्या प्रवासासाठी हात पसरण्याची वेळ
- अरुण बारसकर
सोलापूर : महाराष्ट्रात कांद्याला दर मिळेना म्हणून कर्नाटकातील बंगळुरु मार्केट यार्डात ट्रकने कांदा घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरू मार्केटमध्ये देशभरातून कांदा घेऊन आलेल्या ट्रकच्या लांबचलांब दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कांदा ठेवायला जागाच नसल्याने नंबर येणार कधी आणि भाव मिळणार किती, याची काहीच शाश्वती नसल्याने कांदा घेऊन परतीचा प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी पैसे मागविले आहेत.
सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून बंगळुरू मार्केटमध्ये कांदा जातो. सध्या तेथे कांदा उरतण्यासाठी जागा नसल्याने बाहेर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी २०० ते ६०० रुपये दर मिळाला. काही कांदा प्रति क्विंटल ८०० रुपयानेही विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरहून बंगळुरूला कांदा वाहतुकीसाठी प्रति टन २४०० रुपये भाडे घेतले जात आहे. एका ट्रकचे वाहतुक भाडे किमान ५६ हजार रुपये मोजावे लागते. शिवाय हमालीही द्यावी लागते. ज्यांच्या कांद्याला २०० व ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यांना पदरमोड करावी लागत आहे.
खाते-पोते बार झाले अन्...
गावडीदारफळचे अर्जुन पवार, धर्मराज पवारसह चार शेतकरी एका ट्रकमध्ये कांदा बेंगलोरला विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये, ३०० रुपये, ३५० रुपये व ४०० रुपये दर मिळाला. ट्रकचे भाडे व बेंगलोरला जाण्यासाठी झालेला वैयक्तिक खर्च वजा जाता आतबट्ट्याचा व्यवहार झाला. कांदा उत्पादन, कांदा कापणी व भरणीचा खर्च आम्हाला सोसावा लागला, असे पवार म्हणाले.
गुरुवारी रात्री कांदा भरुन गेलेला ट्रक शनिवारी बंगळुरुला पोहोचल्या. सोमवारी विक्री झाली. ११८ पिशव्याचे १२ हजार ५०० रुपये गाडी गेले. चार दिवसाचा खर्च वगळता हातात काहीच राहीले नाही.
- श्रीकांत ननवरे
कांदा उत्पादक शेतकरी