मराठा क्रांती मोर्चासाठी कांदा मार्केट बंद राहणार!

By admin | Published: September 20, 2016 03:09 AM2016-09-20T03:09:57+5:302016-09-20T03:09:57+5:30

कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार

Onion market will be closed for the Maratha Kranti Morcha! | मराठा क्रांती मोर्चासाठी कांदा मार्केट बंद राहणार!

मराठा क्रांती मोर्चासाठी कांदा मार्केट बंद राहणार!

Next


नवी मुंबई : कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. इतर मार्केटमधीलही माथाडी कामगार व व्यापारी मोर्चात सहभागी होणार असून एपीएमसीमधून ट्रक, कार व मोटारसायकल रॅलीने सर्व जण मोर्चात सहभागी होणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा कोकणभवनवर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या सर्व संघटना, व्यापारी, कामगार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील मराठा भवन व एपीएमसीच्या माथाडी भवनमध्ये झालेल्या नियोजन बैठकीला शेकडो नागरिकांनी हजेरी दाखविली होती. याशिवाय सानपाडा, नेरूळ, सीवूड व इतर शहरात सर्वच नोडमध्ये मराठा समाजातील नागरिकांनी बैठका घेवून सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ उभी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे त्यांचे स्वप्न होते. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुतांश सर्व माथाडी कामगार कोकणभवनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत:हून मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मार्केटमधून १५० मोटारसायकल, २०० कार व २० ट्रकची रॅली एपीएमसीमधून आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढली जाणार आहे. खारघर उत्सव चौकातून सर्वजण पायी कोकणभवनपर्यंत मूक मोर्चात सहभागी होणार आहेत.
माथाडी कामगारांप्रमाणे शहरातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, वकील व इतर घटकांनी मोर्चाच्या तयारीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. नवी मुंबईमधून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांनी मोर्चासाठी उपस्थित राहावे यासाठी तयारी सुरू केली आहे.
प्रत्येक नागरिकाने मोर्चात सहभागी व्हावे यासाठी सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी फोन करून व घरोघरी जावूनही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रुप तयार करूनही मोर्चाच्या तयारीविषयी माहिती दिली जात आहे. राज्यभर होत असलेल्या मोर्चातील गर्दीचे व्हिडीओ व छायाचित्र पाठवून सहभागी होण्याचे आवाहन केले जात असल्याने कोकण भवनमधील मोर्चामध्येही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
>मोर्चासाठी जय्यत तयारी
मराठा क्रांती मोर्चासाठी येणारी वाहने उभी करण्यापासून ते मोर्चा शिस्तबद्धपणे काढण्यासाठीची तयारी सुरू आहे. शेकडो स्वयंसेवक यासाठी प्रयत्न करत आहेत. मोर्चासाठी कडक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. कुठेही घोषणाबाजी केली जावू नये. मोर्चाचे गांभीर्य जाईल अशाप्रकारे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Onion market will be closed for the Maratha Kranti Morcha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.