कांद्याचा वांदा!
By admin | Published: December 8, 2015 01:47 AM2015-12-08T01:47:45+5:302015-12-08T01:47:45+5:30
घाऊक बाजारात कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव आणि वणी येथे सोमवारी ‘रास्तारोको’ करून लिलाव बंद पाडले होते
नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव आणि वणी येथे सोमवारी ‘रास्तारोको’ करून लिलाव बंद पाडले होते. ‘रास्तारोको’मुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने लिलाव पुन्हा सुरू झाले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत सोमवारी क्विंटलमागे भावात ९०० रुपयांची घसरण झाल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर सकाळी दीड तास ‘रास्तारोको’ केला. कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी न झाल्याने निर्यातदार व्यापारी लिलावात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे शनिवारच्या तुलनेत सोमवारी भाव घसरले. शेतकऱ्यांनी सकाळी कोटमगाव रस्त्यावर बस अडविली. दुपारनंतर लिलाव पूर्ववत झाले.
पिंपळगावमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचा क्विंटलमागे भाव १,५०० ते २,४०० रुपये होता. सोमवारी मात्र व्यापाऱ्यांनी १,००० ते १,६७५ रुपये भावाने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर कांदा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्यांसंबंधी जिल्हाधिकारी, तसेच केंद्र सरकारला निवेदन पाठविले.
वणीतील बाजारभाव कोसळल्याने उत्पादकांनी लिलाव बंद पाडत वणी-पिंपळगाव रस्त्यावर ‘रास्तारोको’ केला. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पिंपळगावला लिलाव बंद
पिंपळगाव (बसवंत) येथील बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेत झालेली वाढ व गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास १ हजार रुपयांच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी सोमवारी कांद्याचे लिलाव बंद पाडले.