राज्यात कांद्याची दरवाढ सुरूच; मुंबईत ८५ तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये १२१ रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:26 AM2020-10-21T08:26:40+5:302020-10-21T08:27:28+5:30
राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी १९,३४६ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी राज्यभर फक्त १० हजार २२ टन आवक झाली आहे. यामुळे बाजारभाव वाढले आहेत.
नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यभर कांद्याचा तुटवडा सुरूच आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी ५० ते ८५ रुपये किलो दराने विक्री झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये हलक्या कांद्याला ४५ रुपये व चांगल्या कांद्याला तब्बल १२१ रुपये दर मिळाला आहे. सोलापूरमध्येही कांदा ५ रुपयांपासून १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे कांद्याचे दर प्रतिदिन वाढत आहेत.
राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी १९,३४६ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी राज्यभर फक्त १० हजार २२ टन आवक झाली आहे. यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मुंबई एपीएमसीमध्ये सोमवारी ४० ते ७० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता.
मंगळवारी हे दर ५० ते ८५ रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. आवक वाढली नाही तर दसऱ्यापर्यंत कांदा शंभरीपार जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात जास्त दर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये मिळाला आहे. मंगळवारी येथे हलक्या दर्जाचा कांदा ४५ रुपये किलो व चांगल्या दर्जाचा कांदा १२१ रुपये किलो दराने विकला असून हा राज्यातील विक्रमी दर आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी ५ रुपये व जास्तीत जास्त १०० रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली आहे. अहमदनगरमधील राहता बाजार समितीमध्येही कांदा २० ते १०५ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.
राज्यातील बाजार समितीतील दर -
मुंबई - ५० ते ८५
जुन्नर आळेफाटा - ४५ ते १२१
सोलापूर - ५ ते १००
कोल्हापूर - २५ ते ८०
पुणे - २० ते ८२
नागपूर - ४० ते ५५
नाशिक - ३२ ते ७०
लासलगाव - २० ते ७७
राहता - २० ते १०५