तिखट कांद्याची गोड बातमी; पुढच्या १५ दिवसांत १५ रुपयांनी होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:06 AM2020-01-14T02:06:41+5:302020-01-14T02:06:56+5:30
देशात उत्पादनात २६% घट होण्याचा अंदाज
योगेश बिडवई
मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात १00 रुपये किलोवर गेलेला आणि आता ६0-६५ रुपये किलो असलेल्या कांद्याचा राज्यात पुरवठा वाढल्याने तो महिनाअखेर ५0 रुपयांच्या खाली येण्याची स्थिती आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असून, मालाचा दर्जाही चांगला असल्याने देशभरातही लवकरच सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने कांद्याच्या लागवडीस व पिकालाही मोठा फटका बसला. साहजिकच, खरिपाचे उत्पादन घटून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात राज्यात कांद्याची आवक २५ लाख क्विंटल म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली होती. नोव्हेंबर महिन्यात आवक वाढून ४0 लाख क्विंटल झाली. तरीही त्यात सुमारे २५ ते ३0 टक्के घट होती. जानेवारीत आता आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १३ जानेवारीपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे २४ लाख क्विंटल आवक झाली आहे. तर घाऊक बाजारात क्विंटलला सर्वसाधारण भाव ३,३६६ रुपये आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सुमारे ५५ हजार क्विंटल आवक होईल, असा अंदाज आहे. दरवर्षी जानेवारीत ६५ ते ७0 क्विंटल आवक होते, म्हणजे जानेवारीतही मागणीच्या तुलेन १0 ते १५ क्विंटल पुरवठा कमीच राहणार आहे.
मात्र दिलासादायक म्हणजे नाशिक जिल्ह्यांतील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे आदी बाजार समित्यामंध्ये आवक चांगली वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात साधारणपणे एक ते सव्वा लाख क्विंटल आवक होत असते. जानेवारी महिन्यात रोज साधारणपणे एक लाख क्विंटल माल बाजारात येत आहे. शिवाय आठवडाभरापासून मालाचा दर्जाही चांगला आहे.
यंदा ५२ लाख टन उत्पादन अपेक्षित
भारतात २0१९-२0 मध्ये कांद्याच्या खरिप, लेट खरिप उत्पादनात साधारणपणे २६ टक्के घट होऊन ५२.0६ लाख टन होईल, असा अंदाज केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशात गेल्या वर्षी कांद्याचे ६९.९१ लाख टन उत्पादन झाले होते.