मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे अन् तूर डाळीचा वर्षाव!
By admin | Published: March 8, 2017 01:19 AM2017-03-08T01:19:18+5:302017-03-08T01:19:18+5:30
खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक विधानभवनासमोर येऊन मंत्री,आमदारांच्या गाड्यांवर कांदे आणि तूरडाळ फेकली.
मुंबई : खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक विधानभवनासमोर येऊन मंत्री,आमदारांच्या गाड्यांवर कांदे आणि तूरडाळ फेकली. दोन्हींचा काही मिनिटांतच सडा पडला. पणन राज्यमंत्री आणि संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला.
शेतमालाला योग्य भाव नाही, शेतकऱ्यांची दुर्दशा झाली असल्याचे सांगत या कार्यकर्त्यांनी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हे आंदोलन केले. त्यावेळी मंत्री, आमदार अधिवेशनासाठी गाड्यांनी विधानभवनात जात होते. त्याचवेळी गनिमीकावा वापरत खा.शेट्टी आणि वीस-पंचवीस कार्यकर्ते अचानक समोर आले आणि त्यांनी कांदे व तूरडाळा गाड्यांवर आणि सुरक्षेसाठी उभारलेल्या विधानभवनाच्या गेटसमोर कांदा व तूरडाळ फेकणे सुरू केले आणि शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या तडाख्यातून सदाभाऊ खोत यांची गाडीही सुटली नाही. या गेटवर एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी खा.शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
गेले काही दिवस खा.शेट्टी आणि खोत यांच्यात विसंवादाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून तर खोत यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले नाही ना अशी चर्चा विधानभवन परिसरात होती. भाजपाच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी असलो तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कशाचीही तमा बाळगणार नाही. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडू, असे खा.शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.
स्वत: खोत यांनी पत्रकारांशी बोलताना आजच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्याचवेळी आमचे सरकार शेतमालाला योग्य भाव देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे आणि त्या संदर्भात अजूनही निर्णय घेईल, असे ते म्हणाले.