आॅनलाइन ७/१२ नोंदीमुळे शेतकरी त्रस्त
By admin | Published: November 3, 2016 01:35 AM2016-11-03T01:35:25+5:302016-11-03T01:35:25+5:30
सात-बारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी ‘ओडीयू २ ओल्ट डाटा अपडेशन’ ही प्रणाली चार महिन्यांपासून बंद पडली
केंदूर : सात-बारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी ‘ओडीयू २ ओल्ट डाटा अपडेशन’ ही प्रणाली चार महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे काही हजार सात-बारा उताऱ्यांचे दुरुस्ती काम बंद आहे. एनआयसी (नॅशनल इन्फामेट्रिक सेंटर) महसूल कर्मचाऱ्यांच्या वादात जमीनमालक भरडले जात आहेत.
भूमिअभिलेख विभागाने ई-फेरफार योजना हाती घेतली आहे. गेल्या चार वर्षांपासून या योजनेचे कामकाज सुरू आहे; मात्र यातील अडचणी सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ई-फेरफार या योजनेचे संगणक प्रणालीचे काम एनआयसीला देण्यात आले आहे. मात्र, संगणकीय तांत्रिक त्रुटी दूर करण्यात अद्यापही प्रशासनला (एनआयसीला) यश आलेले नाही. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मध्यंतरी सात-बारा उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी एनआयसीने ‘एडिट मॉडेल’ ही सुविधा उपलब्ध केली; परंतु या पद्धतीने सात-बारा उताऱ्यावरील दुरुस्ती वेळखाऊ आहे. त्यामुळे ‘ओडियू २’ या पद्धतीने तलाठ्याकडून जागेवर सात-बारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जाते; परंतु जुलै महिन्यानंतरही ती दुरुस्त होऊ शकलेली नाही.
त्यामुळे सात-बारा उताऱ्यावरील नावातील दुरुस्ती, खातेविभागणी, एकत्रीकरण आदींचे काम थांबले आहे. या संदर्भात चौकशी केल्यानंतर ‘आमच्या यंत्रणेत कोणताही दोष नाही, असे उत्तर एनआयसीकडून दिले जाते, तर ही यंत्रणा बंद असल्यामुळे सात-बारा उताऱ्यात दुरुस्ती होऊ शकत नाही, असे उत्तर तलाठ्यांकडून दिले जात आहे. (वार्ताहर)
लवकरात लवकर सुधारणा करावी
आॅनलाइन कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.परंतु, यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष बंटी ढोकले व सामाजिक कार्यकर्ते संग्राम ढोकले यांनी सांगितले आहे.