राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:35 PM2019-02-08T18:35:00+5:302019-02-08T18:40:28+5:30
पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पहिली सोडत १४ मार्च २०१९ रोजी जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या प्रवेशाच्या २५ टक्के जागा मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश मिळालेल्या संपूर्णत: मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व इतर साहित्य शाळेने मोफत देणे कायद्याने बंधनकारक आहे. शाळेपासून १ ते ३ किलोमीटरच्या अंतरावर राहत असलेल्या पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. पहिल्या फेरीत एक किलोमीटरच्या आत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होईल. त्यानंतर त्यापेक्षा दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेत विचार केला जातो.