बोलीभाषांच्या जतनासाठी आता ऑनलाइन संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:31 AM2020-01-01T05:31:22+5:302020-01-01T06:46:19+5:30
दोन दिवसांत ५०० हून अधिक शब्द संग्रही; सर्वसामान्यांनाही सहभाग घेणे शक्य, विनामूल्य शब्दकोश होणार ऑनलाइन
- स्नेहा मोरे
मुंबई : गेल्या काही वर्षांत सर्व स्तरांतून बोलीभाषांचे वैभव लयाला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. झपाट्याने फोफावत चाललेल्या इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीत आपण भाषेला दुय्यम स्थान देत आहोत. मात्र आता हेच वैभव जतन करण्याची किंबहुना वाढविण्याची संधी मिळणार आहे. ई-बुक्ससाठी प्रसिद्ध ब्रोनॅटो या संस्थेने बोलीभाषांच्या ऑनलाइन संग्रहाच्या उपक्रमाची सुरुवात केली. अवघ्या दोन दिवसांत ५०० हून अधिक शब्दांचा संग्रह झाला. बोलीभाषांच्या शब्दकोशासाठी सर्वसामान्यही सहभाग घेऊ शकणार आहेत.
बोलीभाषांच्या ऑनलाइन शब्दकोशासाठी ब्रोनॅटोने गुगल फॉर्म तयार केला असून हा सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध आहे. या फॉर्ममध्ये कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, वऱ्हाडी, सामवेदी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, खाल्ल्यान्गी, नंदुरबारी, वर्ल्यांगी, डोंगरांगी, जामनेरी, खान्देशी/ अहिराणी, गोंड, भिल्ल, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया व अन्य भाषांचे पर्याय दिले आहेत. या भाषांमधील एका भाषेची निवड करून बोलीभाषेतील शब्द व त्यांचे अर्थ यात समाविष्ट करायचे आहेत. शिवाय, यात बोलीभाषांतील म्हणीही नोंद करता येऊ शकतात.
ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून बोलीभाषांचा अभ्यास करत होतो, त्यासंदर्भात कथा स्पर्धाही घेतली. हा अभ्यास करताना बोलीभाषेतील साहित्य खूप आहे, मात्र त्यांचे संदर्भ आढळले नाहीत. आताच्या पिढीला काहीसे बोलीभाषेतील शब्द माहिती असतील, परंतु त्यानंतरच्या पिढीला तर याबाबत फारच तुरळक माहिती असेल. याच विचारातून बोलीभाषांचे संकलन, संवर्धन आणि साहित्यनिर्मिती प्रकल्प सुरू करायचा निर्णय घेतला. मराठीतून हा प्रकल्प सुरू केला, त्याला दोन दिवसांत अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. माहिती संकलित झाल्यानंतर सर्वांसाठी विनामूल्य हे शब्दकोश आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील.
तुमचे नावही झळकणार
सोशल मीडियावर सर्फिंग करण्यात आपण बराच वेळ खर्च करतो, त्यातला काही वाटा या प्रकल्पालाही देण्यात यावा याकरिता ब्रोनॅटोने या प्रकल्पाला अनोख्या संकल्पनेची जोड दिली आहे. त्यात या बोलीभाषांच्या प्रकल्पासाठी तुम्ही नोंदणी केलेले शब्द व त्यांचे अर्थ सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर शेअरही केले जातील. या माध्यमातून सर्वांनी प्रेरणा घेऊन बोलीभाषांच्या प्रकल्पासाठी योगदान द्यावे, हा यामागचा हेतू आहे.
लवकरच कोकणी भाषेचाही संग्रह
मराठीच्या आॅनलाइन शब्दकोशाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, त्यात बरेच जण आता अन्य भाषांसाठी विचारत आहेत. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता कोकणी भाषेची निवड करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कोकणी भाषा संग्रहासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. बोलीभाषा समृद्ध होण्यासाठी मदत करणे, हा यामागचा उद्देश आहे.
‘आपल्याच मातीत होतेय भाषेची गळचेपी’
इंटरनेटच्या विश्वात भाषा सहज, सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. मात्र मराठी भाषेत तसे काम झाले नसल्यामुळे आपल्याच मातीत भाषेची गळचेपी होते आहे. त्यात शासन दरबारीही भाषेला न्याय मिळत नसल्याने आता आपण मातृभाषा जगविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी सांगितले.