अब्जाधीश प्रतिष्ठितांना आॅनलाइन गंडा
By admin | Published: August 21, 2016 08:59 PM2016-08-21T20:59:13+5:302016-08-21T20:59:13+5:30
तज्ज्ञ डॉक्टर आणि उच्चशिक्षितांच्या बँक खात्यातील रक्कम काढून त्यांना लाखो रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला
सचिन राऊत/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 21 - शासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यावरील उपजिल्हाधिकारी,पत्रकार, अन्यायापासून संरक्षण करणाऱ्या पोलिसासह अस्थीरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि उच्चशिक्षितांच्या बँक खात्यातील रक्कम काढून त्यांना लाखो रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. बँक खाते आॅनलाइन करण्यासोबतच ते बंद होणार नाही याची दक्षता म्हणून बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी डिजिटल आकडा आणि सीव्हीव्ही क्रमांक घेऊन या लब्धप्रतिष्ठितांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आली आहे. सामान्य नागरिक तर गंडविल्या जातातच पण या लब्धप्रतिष्ठितांना गंडविल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाऱ्यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून खाते बंद न होण्यासाठी एटीएम कार्डच्या मागे असलेला १६ अंकी डिजिटल आकडा आणि सीव्हीव्ही क्रमांक विचारण्यात आला. त्यांनीही बँकेतून फोन असल्याचा विश्वास ठेवत हा आकडा सांगितला; मात्र त्यांना काही कळायचा आतच बँक खात्यातील २५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली. असाच प्रकार एका मोठ्या हिंदी वर्तमानपत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ उपसंपादकासोबत घडला. त्यांच्या बँक खात्यातूनही २८ हजार रुपये अशाच प्रकारे काढण्यात आले. अकोल्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ यांच्याही खात्यातून तब्बल एक लाख ४८ हजार रुपये बँकेतून बोलत असल्याच्या नावाखाली काढण्यात आले. त्यांनीही फोनवर सीव्हीव्ही क्रमांक आणि १६ अंकी डिजिटल आकडा समोरच्याला सांगितला होता. यासोबतच अकोला जिल्हा पोलीस दलात वायरलेस विभागातील पोलीस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातूनही ३० हजार रुपये काढण्यात आले. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला १ लाख २८ हजार रुपयांनी अशाच प्रकारे गंडविले. तर गोरक्षण रोडवरील रहिवासी असलेले आणि विदेशात ओमान येथे नोकरीवर असलेल्या एका युवकाने भावाच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाठविलेले ४ लाख ९६ हजार रुपयेही बँक खात्यातून परस्पर काढण्यात आले. बँक खाते आॅनलाईन करण्याच्या नावाखाली आणि बँक खाते बंद होणार असल्याने एटीएम कार्डवरील १६ अंकी डिजिटल आकडा व सीव्हीही क्रमांक विचारून ही फसवणूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र त्यानंतरही अनेक उच्चशिक्षितांना हा क्रमांक फोनवर विचारून आर्थिकदृष्ट्या गंडविल्या जात आहे.
महाराष्ट्र इझी टार्गेट
एटीएम कार्डवरील १६ अंकी आकडा आणि सीव्हीही क्रमांक महाराष्ट्रातील नागरिक सहजरीत्या सांगतात. त्यामुळे ह्यहॅकर्सह्णच्या लेखी महाराष्ट्र इझी टार्गेट असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. बँक खाते बंद करणे आणि बँक खाते आॅनलाइन करणे एवढ्या छोट्या बाबीला बळी पडत महाराष्ट्रातील नागरिक सर्वच माहिती अतिशय सहज देत असल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
मोडस आॅपरेंडी एकच
बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीची मोडस आॅपरेंडी एकच असल्याचे तक्रारदार समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. उपजिल्हाधिकारी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर, पोलीस, पत्रकार आणि उच्चशिक्षितांना फसविण्यासाठी केवळ बँक खाते बंद होणार असून त्यासाठी एटीएम कार्डवरील क्रमांक मागण्यात आला आहे. यासोबतच खाते आॅनलाइन करण्याचे सांगताच या सर्वांनी माहिती फोनवर दिल्याचे उघड झाले आहे.
४५ मिनिटांत ५ लाख गायब
गोरक्षण रोडवरील एक युवक ओमान येथे नोकरीसाठी आहे. या युवकाच्या भावाचा पुणे येथे अभियांत्रिकी प्रवेश असल्याने त्याने ४ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम भावाच्या बँक खात्यात टाकली. ही रक्कम ५ वाजून १२ मिनिटांनी सदर युवकाच्या बँक खात्यात आल्यानंतर ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत या खात्यातून तब्बल ४ लाख ९६ हजार रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम एटीएमवरील क्रमांक घेऊनच काढण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून करण्यात येत आहे.
दिल्ली आणि छत्तीसगढमध्ये तपास
अकोल्यातील या दिग्गजांच्या बँक खात्याच्या नावाखाली आॅनलाईन पैसे काढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सायबर सेलकडून करण्यात येत आहे. या पथकाने दिल्ली आणि छत्तीसगढ गाठून तपास केला. दिल्ली पोलिसांचीही मदत घेतली; मात्र दिल्ली पोलिसांनी संपूर्ण देशातील पोलीस अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्लीत येत असल्याचे सांगितले; मात्र अद्याप एकाही गुन्ह्याचा छडा लागला नसल्याचे समोर आले आहे.
दिग्गजांना असा बसला फटका
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ - १ लाख ४८ हजार
उपजिल्हाधिकारी - २५ हजार रुपये
कारागृहातील पोलीस - १ लाख २८ हजार
ओमान येथील युवक - ४ लाख ९६ हजार
वायरलेस विभागातील पोलीस - ३० हजार
वरिष्ठ पत्रकार - २८ हजार
सेवानिवृत्त जवान -८० हजार