"आॅनलाइन व्यवहार म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील लढा"
By admin | Published: April 15, 2017 01:46 AM2017-04-15T01:46:28+5:302017-04-15T01:46:28+5:30
देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार आॅनलाइन आणि कॅशलेस पद्धतीने सुरू केले आहेत. देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा
मुंबई : देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार आॅनलाइन आणि कॅशलेस पद्धतीने सुरू केले आहेत. देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन व्यवहारांची सुरुवात ही एका अर्थाने भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात असल्याचे मत शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या निति आयोगाच्या वतीने देशभरात सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या डिजीधन मेळाव्याचा समारोप आज पालकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, असे सांगून तावडे म्हणाले की, देशातील काळे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट ही योजना सुरू करण्यात आली आहे. सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळत आहे. डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे व्यवहार हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठरणार आहेत. डिजिटल व्यवहार ही अतिशय पारदर्शी यंत्रणा असून, त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डिजीधन योजनेअंतर्गत लकी ग्राहक योजना व डिजीधन व्यापार योजना यामध्ये निवडलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घोषवाक्य व लघुकविता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)