आॅनलाईन जमा ७२ कोटी

By admin | Published: May 18, 2016 12:51 AM2016-05-18T00:51:12+5:302016-05-18T00:51:12+5:30

नेट बँकिंगने घरबसल्या आॅनलाईन मिळकत कर जमा करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत दर वर्षी वेगाने वाढ होत आहे.

Online deposits 72 crores | आॅनलाईन जमा ७२ कोटी

आॅनलाईन जमा ७२ कोटी

Next


पुणे : नेट बँकिंगने घरबसल्या आॅनलाईन मिळकत कर जमा करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत दर वर्षी वेगाने वाढ होत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच पालिकेच्या तिजोरीत आॅनलाईन पद्धतीने तब्ल ७२ कोटी रुपये जमा झाले आहेत. १० टक्के सवलतीची मुदत ३० जूनपर्यंत असल्याने यात वाढ होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
पालिकेचे एकूण मिळकतधारक ८ लाख २० हजार आहेत. त्यांपैकी ५ लाख ५० हजार जणांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी कर संकलन विभागाने जमा केले आहेत. या सर्वांना एकूण मिळकत कर, तो कसा आकारला, कधीपर्यंत जमा करायचा अशी सविस्तर माहिती एसएमएस व मेल आयडीने पाठविली जाते. या माहितीवरच पे आॅनलाईन असा पर्याय आहे. त्यावर क्लिक केले, की कर संकलन विभागाची लिंक ओपन होते. या लिंकवर गेले, की त्यावर नेट बँकिंगचा त्याचा क्रमांक, खाते क्रमांक व रक्कम नोंद करायची. त्यानंतर सेंडवर क्लिक केले, की ती रक्कम त्याच्या खात्यातून थेट महापालिकेच्या खात्यात जमा होते. (प्रतिनिधी)
>३० जूनपर्यंत आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांमध्ये वाढ
मागील आर्थिक वर्षात करसंकलन विभागाने १ हजार १८४ कोटी रुपयांचा कर जमा केला. त्यातील फक्त १६० कोटी रुपये या आॅनलाईन पद्धतीने जमा झाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल व मे अर्धा या दीड महिन्यातच पालिकेच्या तिजोरीत २२६ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. त्यातील तब्बल ७२ कोटी फक्त आॅनलाईनने जमा झाले आहेत. मागील वर्षापेक्षा ही वाढ ३३ टक्के आहे. पहिल्या ३ महिन्यांत कर जमा केला, तर त्यात पालिका १० टक्के सवलत देते. त्यामुळे ३० जूनपर्यंत आॅनलाईन पद्धतीने कर जमा करणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा अंदाज करसंकलन विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी व्यक्त केला.

Web Title: Online deposits 72 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.