‘फॉरेन टूर’चा आॅनलाईन भूलभुलय्या

By Admin | Published: June 24, 2016 02:14 AM2016-06-24T02:14:23+5:302016-06-24T02:14:23+5:30

‘फॉरेन टूर’च्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्याचा नवीन गोरखधंदा इंटरनेटद्वारे बोगस ट्रॅव्हल कंपन्यांकडून सुरू करण्यात आला असून, कमी खर्चाच्या ‘पॅकेज’ला बळी

The online labyrinth of 'Foreign Tour' | ‘फॉरेन टूर’चा आॅनलाईन भूलभुलय्या

‘फॉरेन टूर’चा आॅनलाईन भूलभुलय्या

googlenewsNext

पुणे : ‘फॉरेन टूर’च्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्याचा नवीन गोरखधंदा इंटरनेटद्वारे बोगस ट्रॅव्हल कंपन्यांकडून सुरू करण्यात आला असून, कमी खर्चाच्या ‘पॅकेज’ला बळी पडलेले नागरिक या भूलभुलय्यामध्ये अडकत चालले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पुण्यामध्ये दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांमध्ये एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विविध ट्रॅव्हल वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहेत.

परदेशवारीदरम्यान पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था, मोटार प्रवास, विविध ‘डेस्टिनेशन्स’वर फिरवणे आणि खानपान याचा खर्च अशी सजवलेली आकर्षक पॅकेजेस ग्राहकांपुढे ठेवली जात आहेत. इंटरनेटवर तर हजारो ट्रॅव्हल एजन्सीच्या जाहिराती पाहायला मिळतात. गुगलमध्ये सर्च केल्यास शेकडो आॅफर्स समोर येतात. ग्राहक नेमक्या याच जाहिरातींना भुलत आहेत. उत्कृष्ट सेवा देण्याच्या नावाखाली मुलामा देऊन ग्राहकांसमोर आणलेल्या या जाहिरातींमधून फसवणुकीशिवाय दुसरे काही हाती लागत नाही.

अशा प्रकारे फसवल्या जाणाऱ्यांमध्ये तरुणांपेक्षा प्रौढ किंवा वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात अनेक अर्ज दाखल होत असून, गेल्या काही दिवसांत पोलीस ठाण्यांमध्येही यासंदर्भातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करण्यापेक्षा नागरिकांनी त्यापूर्वी योग्य खातरजमा करून तसेच संबंधित कंपन्यांची विश्वासार्हता तपासूनच आर्थिक व्यवहार केल्यास फसवणूक टाळली जाऊ शकते.

घटना क्रमांक 1

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘सुमती देशमुख इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन लँग्वेज फॉर वुमन’ या अभ्यासक्रमाच्या 20 विद्यार्थिनींना जर्मनीमध्ये अभ्यास दौऱ्याला जायचे होते. जर्मनीच्या हॅन ओव्हर युनिव्हर्सिटीने या विद्यार्थिनींना भेटीचे निमंत्रण दिले होते. या दौऱ्याच्या विमान प्रवासाचे तिकीट, व्हिसा, हॉटेल आणि जर्मनीतील वाहनव्यवस्था यासाठी ‘हॉलिडे वंडरेज’ या ट्रॅव्हल कंपनीच्या मयूर अशोक पाटील (रा. नीलकुंज अपार्टमेंट, प्रभात रस्ता) याने कमी खर्चाचे कोटेशन दिले. त्यामुळे संस्थेने त्यांच्याशी बोलणी केली. त्याने प्रत्येक विद्यार्थिनीकडून १ लाख २५ हजार असे सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांचे मिळून २५ लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले. पाटीलने व्हिसासाठी रद्द झालेली तिकिटे कागदपत्रांसोबत जोडली होती. त्यामुळे व्हिसा मिळाला नाही. दौऱ्याला काही दिवस शिल्लक असतानाच पाटीलने विद्यार्थिनींचे पैसे खर्च झाल्याचे सांगत आर्थिक फसवणूक केली.

घटना क्रमांक 2
मयूर अशोक पाटील याने त्याच्या हॉलिडे वंडर्स या ट्रॅव्हल एजन्सीद्वारे ग्राहक यशपाल देसाई (रा. आशियाना, समर्थनगर, वडगाव बुद्रुक) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, इटली इ. देशांत पर्यटनाला घेऊन जाण्याचे बुकिंग घेऊन १९ लाख २0 हजार रुपयांना गंडा घातला. देसाई आणि त्यांच्या परिवारातील पाच जणांना ‘फॉरेन टूर’ला जायचे होते. त्यासाठी वंडर हॉलिडेजमध्ये त्यांनी बुकिंग केले होते. हॉटेल, व्हिसा, विमानाची तिकिटे यासह परदेशातील वाहतूक यासाठी पाटीलने त्यांना १९ लाख २0 हजार भरायला लावले. त्यानुसार देसाई यांनी पैसे भरले. खात्यावर पैसे जमा होताच पाटीलने त्यांच्याशी संपर्कच तोडून टाकला.
घटना क्रमांक 3
दुबईच्या सहलीसाठी पैसे घेऊन व्हिसा रद्द झाल्याची बतावणी करीत ट्रॅव्हल्स डील बाजार या कंपनीने तीन प्रवाशांची आर्थिक फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. करण इदनानी (वय २८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांच्या फिर्यादीवरून कंपनीच्या आदित्य व राहुल भसीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इदनानी, त्यांचा भाऊ व सहकारी महिलेला दुबईला टूरसाठी जायचे होते. त्यांनी ट्रॅव्हल्स डील बजार या संकेतस्थळावर जाऊन संपर्क साधला. आरोपींनी त्यांना विमान तिकीट, दुबईमध्ये राहण्याची व्यवस्था आणि हॉटेल व्हिसा असे पूर्ण पॅकेज देऊ केले. त्यासाठी ७५ हजार रुपये आरोपींनी बँकेच्या खात्यावर भरणा करण्यास सांगितली. इदनानी यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरले. परंतु कंपनीने इदनानी यांच्या सहकारी महिलेचा व्हिसा रद्द झाल्याचे कारण सांगत त्यांना पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे.

वंडर हॉलिडेकडून वृद्धाला गंडा
न्यूझीलंडमधील १३ रात्री आणि १४ दिवसांच्या सहलीसाठी वृद्धांकडून दहा लाख रुपये घेऊन वंडर हॉलिडेजच्या मयूर अशोक पाटील (रा. नीलकुंज अपार्टमेंट, प्रभात रोड) याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात नारायण देशपांडे (वय ६४, रा. डहाणूकर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे आणि त्यांचे मित्र बाळकृष्ण पंढरीनाथ कटके यांना न्यूझीलंडला जायचे होते. त्यांच्यासाठी सहलीचे पॅकेज देऊन आरोपी पाटीलने दोघांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले. त्यांची कोणतीही टूर आयोजित न करून फसवणूक केली.

कशा लुटतात या कंपन्या?

इंटरनेटवर विविध पॅकेजेसची जाहिरात केली जाते. वेबसाईटवर नागरिकांना आकर्षित करणाऱ्या योजनांची जाहिरात करून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. गोड बोलून त्यांना सुविधा देण्याचे आमिष दाखवले जाते.
फॉरेन टुर्सचे पॅकेज पसंत पडल्यानंतर ग्राहकांना आॅनलाईन व्यवहाराद्वारे किंवा रोख स्वरूपात बँक खात्यांवर पैसे भरायला सांगितले जातात. पैसे भरल्यानंतर या कंपन्या पुन्हा ग्राहकांना कोणताही प्रतिसाद देत नाहीत.

काय काळजी घ्याल?
शक्यतो माहितीच्या आणि विश्वासार्ह ट्रॅव्हल कंपन्यांकडूनच टुर्सचे बुकिंग करावे.
कमी खर्चामध्ये अधिक सुविधा कोणी देत असल्यास त्याची खातरजमा करावी.
संबंधित ट्रॅव्हल कंपनी कोणाची, कुठली आहे याची सविस्तर माहिती घ्यावी.
कोणत्याही व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत.
आॅनलाईन आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावेत.
ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयासह संबंधित व्यक्तींची विश्वासार्हता तपासून घ्यावी.

अलीकडच्या काळात परदेशामध्ये सहलीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. नागरिक कोणतीही खातरजमा न करता तसेच इंटरनेटवरील माहिती सत्य मानून पैसे गमावून बसतात. नागरिकांनी संबंधित ट्रॅव्हल कंपन्या, एजंट यांची विश्वासार्हता तपासावी. माहिती न घेता कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. कोणाची अशा प्रकारे फसवणूक झालेली असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी अथवा स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा.
- दीपक साकोरे, उपायुक्त,
आर्थिक व सायबर गुन्हे शाखा

Web Title: The online labyrinth of 'Foreign Tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.