बुलडाण्यात उघड झाला होता ऑनलाईन लॉटरी घोटाळा

By admin | Published: June 16, 2016 02:08 AM2016-06-16T02:08:40+5:302016-06-16T02:08:40+5:30

तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी केली होती कारवाई.

The online lottery scam that was revealed in Buldhana | बुलडाण्यात उघड झाला होता ऑनलाईन लॉटरी घोटाळा

बुलडाण्यात उघड झाला होता ऑनलाईन लॉटरी घोटाळा

Next

राजेश शेगोकार / अकोला
सध्या राज्यभर गाजत असलेला ऑनलाइन लॉटरी घोटाळा हा सन २00५ मध्येच बुलडाण्यात उघड झाला होता. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी बुलडाण्यातील ऑनलाइन लॉटरी सेंटरवर धाडी टाकून ७४ गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचे सूत्रधार हे मंत्रालयात असल्याने पुढे तपासावर नियंत्रण आल्याने ऑनलाइन लॉटरीचा हा गोरखधंदा सुरूच राहिला.
२00१ ते २00९ या काळातील ऑनलाइन लॉटरीत मोठा घोटाळा झाला. लॉटरीतून वर्षाकाठी १0 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून तीन हजार कोटी प्राप्तिकर अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ६00 कोटी भरून दोन हजार कोटींपेक्षाही अधिक प्राप्तिकर दडपला गेला. दरदिवशी निघणार्‍या ४३ ड्रॉ मधून शासनाचा ९00 कोटींचा महसूल बुडविला गेला. ही बाब आता समोर आली असल्याने या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. कृष्णप्रकाश हे बुलडाण्यात पोलीस अधीक्षक असताना त्यांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली होती. वरली मटका बंद केल्यामुळे नागरिक ऑनलाइन लॉटरीकडे वळले होते. वरलीपेक्षाही जास्त वेळा ऑनलाइन लॉटरीचा ड्रॉ होत असल्याने जुगार्‍यांसाठी ही पर्वणी होती. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी १६ डिसेंबर २00५ रोजी जिल्हाभरातील ऑनलाइन लॉटरी सेंटरवर धाडी टाकून तब्बल ७४ गुन्हे दाखल करून १४६ आरोपींना अटक केली होती तसेच ३0 लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जप्त केले होते. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्या दरम्यान नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सभागृहातही यासंदर्भात चर्चा झाली; मात्र कृष्णप्रकाश यांच्या तपास पथकाला पुढे सरकता आले नसल्याने ऑनलाइन लॉटरीचा हा गोरखधंदा सुरूच राहिला. हा प्रकार आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने बुलडाण्यातील कारवाईचे अनेकांना स्मरण होत आहे.

विक्रेते अडकले, मोठे मासे बाहेरच !
ऑनलाइन लॉटरी विक्रेत्यांवर कारवाई करून खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा कृष्णप्रकाश यांचा प्रयत्न होता. त्यांनी तब्बल ७४ गुन्हे दाखल करून १४६ आरोपींना अटक केली होती व त्यापैकी ८६ आरोपींना पोलीस कोठडी मिळाली होती. या प्रकरणाचे खरे सूत्रधार हे मंत्रालयात असल्याचे समोर आल्यावर कृष्णप्रकाश यांच्या तपास पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. या कारवाई विरोधात आठ याचिका दाखल झाल्या होत्या. या प्रकरणातील सर्व आरोपी पुढे जामीनावर सुटले; मात्र खरे सूत्रधार बाहरेच राहिले.

कविता गुप्ता अन् कृष्णप्रकाश यांचा सामना!
ऑनलाइन लॉटरीच्या आयुक्त कविता गुप्ता आणि पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांचा सामना नांदेडपासून सुरू होता. नांदेड येथे पोलीस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश यांनी ऑनलाइन लॉटरी विरोधात गुन्हे दाखल केले होते. पुढे ते बुलडाण्यात पोलीस अधीक्षक म्हणून आल्यावर त्यांनी नांदेडप्रमाणचे बुलडाण्यातही कारवाई केली. यावेळीसुद्बा लॉटरीच्या आयुक्त या कविता गुप्ताच होत्या.

Web Title: The online lottery scam that was revealed in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.