आॅनलाइन लॉटरी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:14 AM2018-05-13T04:14:04+5:302018-05-13T04:14:04+5:30
राज्याची आॅनलाइन लॉटरी पुढील चार महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासन लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेला दिल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केला आहे
मुंबई : राज्याची आॅनलाइन लॉटरी पुढील चार महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासन लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेला दिल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केला आहे.
विक्रेता सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच सैनी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आश्वासित केल्याचे वारंग यांनी सांगितले. या भेटीवेळी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक व आमदार सुनील शिंदे यांनी लॉटरीवर लादलेला २८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) कमी करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिंदे यांच्यासह विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग, खजिनदार अविनाश सावंत, मुंबई शहर लॉटरी संपर्क प्रमुख संतोष तोडणकर व मुंबई उपनगर लॉटरी संपर्क प्रमुख संदीप महिदा उपस्थित होते. राज्याची हक्काची लॉटरी नसताना बाहेरील लॉटरीवर २८ टक्के जीएसटी लादल्याने स्थानिक विक्रेते उद्ध्वस्त झाल्याचे विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी बैठकीत सांगितले.
वारंग म्हणाले की, सुमारे ८० टक्के विक्रेत्यांची दुकाने बंद झाली आहेत. तर उरलेली दुकाने लॉटरी प्रतीक्षेत बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर राज्याने स्वत:ची आॅनलाइन लॉटरी जाहीर करून कमीतकमी जीएसटी आकारावा. त्यावर आयुक्त अमित सैनी यांनी सकारात्मक आश्वासन दिले. सरकारचे शिष्टमंडळ आॅनलाइन लॉटरीची पूर्ण माहिती घेण्यासाठी गोव्यामध्ये गेल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील चार महिन्यांत आॅनलाइन लॉटरी सुरू करण्याची ग्वाही सैनी यांनी दिल्याचे वारंग यांनी स्पष्ट केले.