‘आॅनलाइन’ मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 04:59 AM2017-02-27T04:59:51+5:302017-02-27T04:59:51+5:30
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी तिकीट सुविधांमध्ये नवीन बदल केले जात असले तरी ते प्रवाशांच्या ‘पथ्यावरच’ पडत असल्याचे दिसते.
मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी तिकीट सुविधांमध्ये नवीन बदल केले जात असले तरी ते प्रवाशांच्या ‘पथ्यावरच’ पडत असल्याचे दिसते. परंतु याचे एसटी महामंडळाला सोयरसुतकच नाही. एसटीच्या आॅनलाईन तिकीट सेवेतून प्रवाशांकडून तिकीटे काढण्यात येतात. परंतु बहुतांश वेळी तिकीटांचे पैस अदा होतात. मात्र तिकीट निघत नसल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा एसटी स्थानकाची वाट धरावी लागते. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाने कॅशलेसकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. तिकीट खिडकयांवर एसटीकडून स्वाईप मशिन उपलब्ध करण्यात आले आहे. डेबिट कार्ड स्वाईप करताच तिकीटाचे पैसे त्यातून अदा केले जातील आणि तिकीट उपलब्ध करण्यात येईल. ही सेवा देण्यात आली असली तरी त्याआधी प्रवाशांसाठी आॅनलाईन काही वर्षापूर्वी तिकीट सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या प्रवासी तिकीट काढू शकतात.
प्रवाशांकडून एसटी बसचा मार्ग आणि त्यानंतर आसन व्यवस्था आॅनलाईन आरक्षित केल्यानंतर डेबिट कार्डव्दारे पैसे अदा करतात. पैसे अदा करताच तिकीटाची रक्कम कापून जाते. परंतु तिकीट निघाल्याचा मॅसेज प्रवाशांना एसटीकडून येत नाही. तसेच ते आसनही ‘ब्लॉक’होऊन जाते. प्रवाशांना तिकीट निघाले की नाही याची माहितीही समजत नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना स्थानकाकडे घेत प्रवाशांना पुन्हा तेच आसन आणि बस मार्ग मिळवण्यासाठी पैसे अदा करावे लागतात. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आॅनलाईन व्यवहारासाठी एसटीने एका बँकेसोबत करार केला असून त्या बँकेच्या सर्व्हरमध्येच समस्या येत असल्यामुळे प्रवाशांचे पैसे कापले जातात. मात्र हे पैसे तीन किंवा सात दिवसांत प्रवाशांच्या खात्यात जमा होतात. (प्रतिनिधी)
>प्रवासी हैराण
सातत्याने अशा घटना प्रवाशांबरोबर होत असल्याने आॅनलाईन सेवेचा उपयोग काय असा सवाल खुद्द प्रवाशांकडूनच उपस्थित केला जात आहे.