तिकीट दरवाढीविरोधात ‘सेव्ह राणीबाग’ची आॅनलाइन याचिका
By admin | Published: May 3, 2017 04:25 AM2017-05-03T04:25:32+5:302017-05-03T04:25:32+5:30
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागच्या तिकीटदरात २० पटीने वाढ केल्याच्या विरोधात ‘द सेव्ह राणीबाग
मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागच्या तिकीटदरात २० पटीने वाढ केल्याच्या विरोधात ‘द सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन’ या संस्थेने आॅनलाइन याचिका केली आहे. पालिकेने तिकीट दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिकेने १५० वर्षांपूर्वी उद्यान म्हणून सुरुवात केलेल्या राणीबागेत कालांतराने प्राणिसंग्रहालय सुरू झाले. मात्र, आजही राणीबागेतील ६३ टक्के जागा ही झाडे व बगिच्यांनी व्यापलेली असून केवळ १८ टक्के जागांवर जनावरांचे पिंजरे आहेत. तरीही या ठिकाणी आणलेल्या पेंग्विनचा देखभाल खर्च वसूल व्हावा, म्हणून तिकीट दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
केवळ ५ रुपये तिकिटावर राणीबागेत येणाऱ्या प्रौढांना आता यापुढे १०० रुपये, तर २ रुपयांऐवजी लहान मुलांना २५ रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्य नागरिक मात्र या तिकीट दरवाढीमुळे राणीच्या बागेला भेट देणे टाळणे पसंत करतील. त्यामुळे त्यांना प्राणिसंग्रहालयासह निसर्गाच्या सान्निध्याचाही अनुभव घेता येणार नाही.
फाउंडेशनच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्रीकृष्ण, राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखटणकर, व्ही. रंगनाथन, महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांनी पाठिंबा देत शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. तरीही अधिकाधिक नागरिकांनी या आॅनलाइन याचिकेद्वारे शुल्कवाढ मागे घेण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. आॅनलाइन पाठिंबा देणाऱ्यांच्या ई-मेल आयडीची माहिती गुप्त ठेवली जाईल, असेही फाउंडेशनने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
फाउंडेशनच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्रीकृष्ण, राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुखटणकर आदींनी पाठिंबा देत शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.