राज्यात आॅनलाइन पोलीस स्टेशन
By admin | Published: September 16, 2015 12:52 AM2015-09-16T00:52:35+5:302015-09-16T00:52:35+5:30
पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क
नागपूर : पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गुरुवारी झाला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील पोलीस दलाला आधुनिक करण्यासोबतच दर्जात्मक सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. सीसीटीएनएस हा त्याचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढेही महाराष्ट्र पोलीस दलाला ‘डिजिटलयाझेशन’कडे झपाट्याने वाटचाल करायची आहे. मात्र, या आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारायला लावण्यापेक्षा घरबसल्या त्यांना परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तर नागरिकांचा त्रास वाचेल आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढेल
राज्यातील स्मार्ट सिटी केवळ स्मार्टच नव्हे, तर सेफसुद्धा बनाव्यात, असा आपला मानस आहे. सीसीटीव्हीच्या नजरेत असलेले पुणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिले शहर ठरले आहे. काही दिवसांतच मुंबईच्या पहिल्या झोनचे काम पूर्णत्वास येणार असून, पुढच्या काही महिन्यांत राज्यातील सर्व मोठ्या शहरांत सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काय आहे सीसीटीएनएस?
प्रारंभी पोलीस महासंचालक दयाल म्हणाले की, या प्रणालीमुळे राज्यातील १०४१ पोलीस ठाणे तसेच ६३८ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये संलग्न झालीत. एका क्लिकमध्ये विशिष्ट वर्गातील गुन्हेगाराची माहिती उपलब्ध होणार आहे.