आॅनलाइन शॉपिंगची अशीही चोरी!
By admin | Published: April 26, 2017 01:35 AM2017-04-26T01:35:02+5:302017-04-26T01:35:02+5:30
आॅनलाइन शॉपिंगद्वारे महागडा मोबाइल फोन मागवल्यानंतर पैसे न देताच मोबाइल बळकावल्याची घटना ठाण्यात सोमवारी उघडकीस आली.
ठाणे : आॅनलाइन शॉपिंगद्वारे महागडा मोबाइल फोन मागवल्यानंतर पैसे न देताच मोबाइल बळकावल्याची घटना ठाण्यात सोमवारी उघडकीस आली.
वागळे इस्टेट भागातील एका इसमाने अॅमेझॉन कंपनीकडून एचटीसी कंपनीचा २३ हजार ५५९ रुपयांचा मोबाइल फोन आॅनलाइन मागविला होता. आॅनलाइन शॉपिंग करताना बहुतांश ग्राहक ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ अर्थात वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय निवडतात. या ग्राहकानेही हाच पर्याय निवडला होता. १२ एप्रिल रोजी अॅमेझॉन कंपनीचा कर्मचारी मनिष नरीम हा वागळे इस्टेट भागातील आयशर आयटी पार्क परिसरात मोबाइल फोन ग्राहकास देण्यासाठी गेला. आरोपी ग्राहकाने अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याकडून मोबाइल फोन घेतल्यानंतर पैसे न देताच पळ काढला. या प्रकरणाची तक्रार नरीम यांनी १२ एप्रिल रोजीच दिली होती. चौकशी करून सोमवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ यांनी दिली. (प्रतिनिधी)