महारेराकडे अद्याप नोंदणी न केलेल्या प्रकल्पांची इथे माहिती द्या... मुंबई ग्राहक पंचायतीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 07:48 PM2018-09-26T19:48:49+5:302018-09-26T22:28:00+5:30
अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई : रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात महारेरा आघाडीवर असले तरीही रेरा कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत आजही घर खरेदीदारांच्या बऱ्याच तक्रारी आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई ग्राहक पंचायत’ एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे.
अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच घर खरेदीदारांकडून मूळ किंमतीच्या 10% हून जास्त रक्कम घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक तो विक्री करारही अनेक विकासकांनी केलेला नाही. विक्री करार नसला तर अशा ग्राहकांना महारेरात आपल्या तक्रारींची तड लावून घेण्यात अडचणी उभ्या केल्या जात असल्याचेही आढळून आले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘मुंबई ग्राहक पंचायत’ एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातून गोळा करण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्राहकांनी एकूण रकमेच्या 10% पेक्षा जास्त रक्कम भरूनही विकासकांनी विक्री करारनामा केलेला नाही त्या विकासकांची माहिती सुद्धा या सर्वेक्षणातून गोळा करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे मुंबई ग्राहक पंचायत हे दोन्ही प्रश्न महारेराकडे धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
संबंधित घर खरेदीदार ग्राहक या सर्वेक्षणात https://survey.mumbaigrahakpanchayat.org या लिंक वर जाऊन सहभागी होऊ शकतील. हे सर्वेक्षण दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजल्यापासून ते 10 ऑक्टोबर सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत ग्राहकांना उपलब्ध असेल. ग्राहकांना स्मार्ट मोबाईल फोनवरुनही या सर्वेक्षणात ग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ पाच ते सात मिनिटात या सर्वेक्षणात विचारलेली सर्व माहिती ग्राहकांना देता येणार आहे.
तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीनचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी केले आहे.