देशातील पहिल्या डिजिटल व्हीलेजमध्ये ऑनलाईन व्यवहारास प्रतिसाद नाही, मेळघाटातील हरिसाल गावत समस्या ‘जैसे थे’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 05:27 PM2017-11-11T17:27:46+5:302017-11-11T17:29:20+5:30
देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे.
धारणी / अमरावती - देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे. हरीसालवासीयांसाठी गावात लाल दिव्याच्या आलीशान गाड्या येऊ लागल्यामुळे काही दिवसातच कायापालट होईल अशी आशा निर्माण झाली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षाच्या काळात या गावातील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
अमरावती जिल्हा मुख्यालयापासून १४५ किलोमीटर अंतरावर मुख्य मार्गावरील हे गाव एक वर्षापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले. गावात अनेक गोष्टी बदलत आहेत यात शंकाच नाही. डिजिटल व्हीलेजच्या कार्यालय सोफासेट व अद्यावत सुविधांनी सज्ज आहे. मात्र काम करण्यासाठी एकच ऑपरेटर हजर होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात टेली मेडिसीन केंद्र देण्यात आले आहे. मात्र, बरेच रुग्ण थेट धारणी येथे रेफर केले जातात, असे गावक-यांनी सांगितले. जि. प. शाळा, आश्रमशाळा हरिसाल व पोष्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा चिखली यांचेसह दोन अंगणवाडी केंद्रात ई-लर्निंग सुरू आहे.
मात्र नेटची स्पीड कमी असल्याने विद्यार्थ्यांना संगणकावरून काम करताना अडचण येत असल्याची तक्रार मुख्याध्यापक सोपान घोरमाळे यांनी केल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आली नाही.
गावातील राशन कार्ड स्मार्ट करण्यात येत आहे. परंतु दोन महिन्यापासून स्मार्ट राशन कार्ड बनण्याचे काम ठप्प पडले आहे. गावात एटीएम सुविधा केंद्र देण्यात आले आहे. काल हे एटीएम बंद होते. तसेच १६०० खाते ऑनलाईन करण्यात आले असून ४०० बाकी असून ते पूर्ण केले जात आहे. गावातील व्यापाºयांना पीटीएम व बीएचआयएम अॅप दिले आहे. मात्र हे व्यवहार ठप्प आहे. हरिसालच्या सरपंच महिला आहे. गरिब असल्याने त्यांनाही शेती व मजुरीशिवाय पर्याय नाही हे विशेष.
एकाच वेळी कार्यरत असाव्या यंत्रणा
हरिसालमध्ये ११ यंत्रणा काम करीत असले तरी गावात बदल घडून गावक-यांच्या आयुष्यात बदल झालेला नाही. प्रत्येक यंत्रणेचे काम करण्याचे दिवस वेगवेगळे असल्याने खरोखरच काय प्रकार सुरू आहे याची माहिती गावक-यांना देखील नाही. एकाच वेळी सर्व यंत्रणा कामास लागाव्या अशी मागणी गावकरी करीत आहे.
जुन्या गावाकडे लक्षच नाही
डिजिटल व्हीलेजचे कार्यालय नव्या व समृद्ध लोकवस्ती असलेल्या भागात आहे. मात्र जुना हरिसाल जेथे आजही आठवडी बाजार दर बुधवारी भरला जातो तेथील समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासाकडे अधिकारी लक्ष देतील का? असा सवाल करण्यात आला.
देशातील पहिले डिजिटल ग्राम असल्यामुळे येथील विकासासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. ज्या गोष्टींची मागणी केली जाईल. ती सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हरिसाल केवळ देशाच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या नकाशावर दिसावे असा आमचा प्रयत्न आहे.
- विजय राठोडएसडीओ, धारणी
शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, रेशन दुकाने डिजिटल झाली. मोफत इंटरनेट सुविधा मिळत आहे. रोजगारासाठी आॅनलाईनचा पर्याय आहे. पण त्यासाठी ५०-६० हजारांचा खर्च होतो. व्हीसीच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांकडे अनेक मागण्या केल्या आहेत. अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
- गणेश येवले उपसरपंच, हरिसाल
गावात मोबाईल चांगला चालतो यात शंकाच नाही, मात्र गावकºयांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. डिजिटलच्या माध्यमातून रोजगार उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. यासाठी ५०-६० हजार खर्च आहे तो सर्वांना शक्य होत नाही.
- नितीन नाथ ग्रामस्थ हरिसाल