लग्न ठरविण्याचा आॅनलाईन ट्रेंड
By Admin | Published: October 24, 2014 12:15 AM2014-10-24T00:15:22+5:302014-10-24T00:16:51+5:30
संकेतस्थळावर हिट्स वाढल्या : योग्य उमेदवारासाठी आॅनलाईन नावनोंदणीकडे कल
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -पूर्वी वधू पाहण्याचे काम चैत्र-वैशाख या दोन महिन्यांत धूमधडाक्यात चालायचे. आता परिस्थिती बदललीय. वधू-वर सूचक केंद्रे सुरू झाली आहेत. या ठिकाणी वधू-वरांचे फोटो, आदी माहिती उपलब्ध होऊ लागली. आता संकेतस्थळावरून अल्पवेळेत घरबसल्या योग्य वधू-वरांसंबंधी माहिती मिळत असल्याने अनेक संस्थांसह विविध समाजांतील संघटनांचा या वधू-वर संकेतस्थळाकडे पाहण्याचा कल वाढत आहे.
मुलगा किंवा मुलगी लग्नाची झाली की, अमक्याचा मुलगा-मुलगी लग्नाची झाली की कोणी तरी वधू-वर सूचक केंद्रात जाण्यासाठी सुचवतं. पालकांचं वेगळंच म्हणणं असतं. आम्ही बघू तो मुलगा, हिला पसंत पडत नाही. मुलाला नक्की कशी मुलगी हवीय, त्याचाच पत्ता लागत नाही. सुंदर, देखणी मुलगी आणली तरी नाकारतो. हेच सूर प्रत्येक घरात ऐकायला मिळतात; परंतु आता पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या निवडीचा मेळ साधता येईल, यासाठी अनेक संस्थांनी, तसेच समाज-संघटनांनी वधू-वर सूचक केंद्रे सुरू केली आहेत. त्यांच्यावतीने वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र, परगावांतील लोकांना या ठिकाणी येणे शक्य नसते. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ‘आॅनलाईन’ मनं जुळविण्यासाठी संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी वधू-वर सूचक मंडळेच फक्त संकेतस्थळे काढत होती. आता मात्र विविध समाजांतील वधू-वर सूचक मंडळांच्यावतीने ही संकेतस्थळे सुरू केली आहेत. या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.
अशी असते माहिती
याठिकाणी वधू-वरांचे फोटो, जन्मठिकाण, वय, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, गोत्र, पाहुणे मंडळींची नावे, अपेक्षित वधू-वरांची माहिती दिलेली असते. काही संकेतस्थळे मोफत, तर काही शुल्क आकारतात.
आजच्या धावपळीच्या युगात मुलगा-मुलगी घरी जाऊन पाहणे, हे कालबाह्य होत आहे. त्यामुळे लोकांची गरज ओळखून आम्ही लवकरच वधू-वर केंद्राचे संकेतस्थळ सुरू करीत आहोत. त्यामुळे समाजातील मुला-मुलींना घरबसल्या त्यांच्या पसंतीचे वधू-वर निश्चित करता येणार आहेत.
- शांताराम पन्हाळकर, संचालक, चर्मकार समाज वधू-वर सूचक मंडळ