केवळ ११ नगरसेवकांना राजकीय पदोन्नती

By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:02+5:302016-06-07T07:43:02+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ठाण्यात केवळ ११ नगरसेवकांनाच राजकीय पदोन्नती देऊन आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत घेऊन गेली

Only 11 corporators get political promotions | केवळ ११ नगरसेवकांना राजकीय पदोन्नती

केवळ ११ नगरसेवकांना राजकीय पदोन्नती

Next

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ठाण्यात केवळ ११ नगरसेवकांनाच राजकीय पदोन्नती देऊन आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत घेऊन गेली. त्यामध्ये विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे, वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक झालेल्या अनेकांना त्यांचा वॉर्ड राखीव झाल्याने किंवा पराभव झाल्याने पुन्हा राजकारणात डोके वर काढता येत नाही. परिणामी आमदार, खासदार, मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न तेथेच बेचिराख होते. माजी नगरसेवक म्हणूनच त्यांना अखेरपर्यंत मिरवावे लागते. ठाण्यातील चार महापौर, एक उपमहापौर, दोन सभागृह नेते, एक स्थायी समिती सभापती आणि एक विरोधी पक्षनेता यांच्या गळ्यात सतत राजकीय पदोन्नतीच्या माळा पडत गेल्या. ठामपाच्या आठ नगरसेवकांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे भाग्य लाभले. परंतु त्यांच्या नशिबी उच्च श्रेणीचा राजयोग नसल्याने ते ठाण्याच्या तलावातील राजकारणाबाहेर पडू शकले नाहीत.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८६ मध्ये झाल्यानंतर प्रथम महापौर होण्याचा बहुमान लाभलेले सतीश प्रधान यांना राज्यसभेच्या खासदार पदापर्यंत मजल मारता आली. वसंत डावखरे हे १९८७ मध्ये महापौर झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ठाणे विधान परिषदेवर चार वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले आणि विधान परिषदेचे उपसभापती म्हणून दीर्घकाळ लाल दिवा डोक्यावर मिरवत राहिले. १९९३ ते १९९६ या कालावधीत तीनदा महापौर झालेले अनंत तरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने त्यांच्या कपाळावरील नाम महाराष्ट्रभर परिचित झाला. २००५ ते २००७ या कालावधीत महापौर झालेले राजन विचारे हे आमदार आणि विद्यमान खासदार आहेत. त्याचप्रमाणे १९८६ मध्ये उपमहापौर झालेले सिताराम भोईर यांनाही आमदारकीचे पंख लाभले. १९८६-८७ दरम्यान सभागृह नेते राहिलेले प्रकाश परांजपे हे तीनवेळा खासदार होते. २००१ ते २००५ असे पाच वर्षे सभागृह नेते म्हणून काम केलेले एकनाथ शिंदे सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रताप सरनाईक हे दोनदा आमदार झाले. विरोधी पक्षनेते असलेले सुभाष भोईर सध्या आमदार आहेत.
पराभवाने हुकला उच्च राजयोग
नगरसेवक असताना किंवा मुदत संपल्यावर विधानसभा निवडणूक लढण्याची संधी लाभलेल्या. परंतु पराभव झालेल्यांमध्ये मनोज शिंदे, दशरथ पाटील, देवराम भोईर, अशोक राऊळ, हणमंत जगदाळे, राजन किणे, सुधाकर चव्हाण, मालती भोईर या आठजणांचा समावेश आहे.
आमदारकीची प्रबळ इच्छा
माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अशोक वैती, माजी स्थायी समिती सभापती गोपाळ लांडगे व नरेश म्हस्के यांची आमदार होण्याची इच्छा दीर्घकाळ अपूर्ण आहे. आपल्या नशिबाचे फाटक कधी उघडते याची ते वाट पाहत आहेत.

Web Title: Only 11 corporators get political promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.