अवघं 125 वर्ष वयोमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 10:06 AM2017-08-01T10:06:41+5:302017-08-01T11:27:47+5:30
श्रीमंत मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला 31 जुलै 2017 रोजी 124 वर्ष पूर्ण झाली आहेत.
मुंबई, दि. 1- श्रीमंत मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला 31 जुलै 2017 रोजी 124 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1 ऑगस्ट रोजी या वास्तूने 125 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. 24 एप्रिल 2005 रोजी इमारतीला हेरिटेज 2 ए चा दर्जा देण्यात आला. मुंबई महापालिकेच्या इमारतीचे 125 व्या वर्षात पदार्पण होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला महापालिकेचं मुख्यालय नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघालं होतं.
सप्तरंगात उजळणार मुख्यालय
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ३१ जुलै २०१७ रोजी १२४ वर्षे पूर्ण झाली असून, १ ऑगस्ट रोजी इमारतीने १२५व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने देश- विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या महापालिका मुख्यालयाला सप्तरंगी विद्युत रोशणाईने सजविण्यात येत आहे. १ ते १५ ऑगस्टदरम्यान सायंकाळी ७.४५ ते मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत मुंबईकरांना ही रोशणाई पाहता येणार आहे. सायंकाळी ७.४५ ते ७.५० वाजता ‘लाइट कॅसकेडिंग’ ही आकर्षक विद्युत रोशणाई पाहता येईल.
दररोज वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोशणाई ही मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण असणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विषयानुरूप वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोशणाई करण्यात येणार आहे. मुंबईकर, शालेय विद्यार्थी तसेच पर्यटकांना पालिका मुख्यालयाची इमारत व पालिका सभागृह या ऐतिहासिक वास्तू, स्थायी समिती व सभागृह या बैठकांव्यतिरिक्त सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पाहता येणार आहे.
मुंबापुरीचे ‘वैभव’
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ३१ जुलै २०१७ रोजी १२४ वर्षे पूर्ण झाली असून, १ आॅगस्ट रोजी इमारतीने १२५व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयावर रोशणाई करण्यात आली असून, महापालिकेचे मुख्यालय सजविण्यात आले आहे. १८६६ साली महापालिकेचे कार्यालय गिरगावमधील एका साध्या इमारतीमध्ये होते. ९ डिसेंबर १८८४ रोजी मुंबई महापालिकेच्या वास्तूचे बांधकाम सुरू झाले. विख्यात वास्तुविशारद एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी इमारतीचे संकल्पचित्र तयार केले. गॉथिक शैलीतील ही इमारत वेळेत बांधणे हे त्या वेळी एक आव्हान होते. हे आव्हान तत्कालीन अध्यक्ष थॉमस ब्लॅनी, आयुक्त हॅरी अॅक्वर्थ, बांधकाम खात्याचे निवासी अभियंता रावबहाद्दूर सीताराम खंडेराव यांनी स्वीकारले.
महात्मा फुले यांचे निकटवर्तीय व्यंकू बाळाजी यांनी या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेत हे आव्हान पूर्ण केले. इमारतीचा अंदाजित खर्च ११ लाख ८८ हजार ८२ रुपये इतका होता. हे काम व्यंकू बाळाजी यांनी अंदाजित खर्चापेक्षा कमी म्हणजेच ११ लाख १९ हजार ९६९ रुपयांत पूर्ण केले. इमारतीचे बांधकाम १८९३ साली नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण करण्यात आले. अशाच काहीशा नेत्रोद्दीपक रोशणाई करण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी यानिमित्ताने ‘फोकस टाकला आहे.