शुल्कवाढ फक्त १५ टक्के
By Admin | Published: April 25, 2017 02:52 AM2017-04-25T02:52:56+5:302017-04-25T02:52:56+5:30
खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार
मुंबई : खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी कमाल १५ टक्के इतकीच शुल्कवाढ करता येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी खडसावले. ही वाढ करताना पालक-शिक्षक संघटनेची (पीटीए) मान्यताही आवश्यक आहे. मात्र हा निमय मोडणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शुल्काव्यतिरिक्त शाळेतूनच अन्य वस्तू खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशाराही तावडे यांनी दिला आहे. केंद्रीय बोर्डाच्या शाळांच्या पाठ्यपुस्तकाचा प्रश्न पालक आणि शाळांनी बोलून स्पष्ट करावा, असे त्यांनी सांगितले. काही पालकांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय बोर्डाची पुस्तके ही बाजारात उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या शाळांनी आणि पालकांनी हा निर्णय घ्यावा, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
पुढच्या शैक्षणिक वर्षासाठीही शाळांनी शुल्कवाढ केल्याने पालकांनी अलीकडेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. अखेर पालकांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.(प्रतिनिधी)
मनमानीला चाप गेल्या काही वर्षांत खासगी शाळांची मनमानी वाढते आहे. भरमसाठ शुल्कवाढ दरवर्षी केली जाते. त्यामुळे पालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.