अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 07:41 PM2024-10-27T19:41:09+5:302024-10-27T19:41:34+5:30
महायुती आणि महिविकास आघाडीने आतापर्यंत किती उमेदवार जाहीर केले? पाहा...
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले नाहीत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अद्याप दोन्ही गटांनी 288 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत वाद सुरुच आहे.
महाविकास आघाडीने आतापर्यंत 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर महायुतीने 215 उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जवळपास एक चतुर्थांश जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीने अद्याप 73 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर महाविकास आघाडीने 49 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
महाविकास आघाडीत जागांवाटपावरुन वाद
महाविकास आघाडीने आतापर्यंत 288 पैकी 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसकडून 87, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित जागांबाबत वाद सुरू असून, यासाठी सातत्याने मविआत चर्चांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या उर्वरित उमेदवार जाहीर होऊ शकतात.
महायुतीची परिस्थितीत तशीच
त्याचबरोबर महायुतीकडून 215 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक 121 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 49 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 73 जागांबाबत महायुतीत वाद सुरू असून, सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या महायुतीचीही अंतिम यादी येऊ शकते.