‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमास केवळ २५० निमंत्रित !

By admin | Published: August 18, 2015 01:34 AM2015-08-18T01:34:26+5:302015-08-18T02:18:16+5:30

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वादळ उठल्याने येत्या बुधवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ््यास केवळ २५० व्यक्तींनाच

Only 250 invited to 'Maharashtra Bhushan' program! | ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमास केवळ २५० निमंत्रित !

‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमास केवळ २५० निमंत्रित !

Next

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वादळ उठल्याने येत्या बुधवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ््यास केवळ २५० व्यक्तींनाच निमंत्रणे देण्यात आली आहेत. या कार्यक्रमात केवळ मुंबईतील आमदारांना निमंत्रित केले असून पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही या सोहळ््याकरिता बोलावले नसल्याचे समजते. तर, लिखाणाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत पुरंदरे यांनीही हा पुरस्कार नम्रपणे नाकारावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. मात्र पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विविध संघटना, शरद पवार, भालचंद्र नेमाडे, राधाकृष्ण विखे पाटील, तसेच उदयनराजे भोसले अशा अनेकविध व्यक्तींनी विरोध केल्याने आता हा कार्यक्रम राजभवनावर होणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त २५० व्यक्ती बसू शकतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
या निमंत्रितांमध्ये कुणाचा समावेश आहे, असे विचारले असता केवळ मंत्री व मुंबईतील आमदार, खासदार यांना निमंत्रित केले जाईल, असे स्पष्ट केले.

साहित्यिकांमध्ये मतांतर
यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून साहित्यिकांमध्ये मतमतांतरे आहेत. अवघ्या दोन दिवसांवर पुरस्कार वितरण सोहळा येऊन ठेपला असतानाच आता हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे, पुरस्कार वितरण सोहळ््याच्या दिवशीच सकाळी या प्रकरणी सुनावणी होईल.

पुरस्कार योग्यच !
सत्तेत जे सरकार आहे, ते आपण निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला पुरस्कार योग्यच आहे. या पुरस्काराला विरोध करणाऱ्यांनी त्यांची भूमिका साहित्यातून मांडावी. शिवशाहीरांच्या लेखणीतून जे चुकीचे मांडले आहे, ते न पाहता त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा हा गौरव या दृष्टीकोनातून पाहावे. - शेषराव मोरे, साहित्यिक, विश्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष

वादाला शासनच कारणीभूत
एखाद्या पुरस्कारावरुन एवढा वादंग निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाल्यावर याविषयी शासनाने उत्तर देणे अपेक्षित आहे. पुरस्कार जाहीर झाला म्हणजे जबाबदारी
संपत नाही. शासन काहीच बोलत नाही,
म्हणजेच शासनाला समाजात तेढच हवी आहे, असे दिसते आहे.
-राजन खान, साहित्यिक

नियुक्तीमागे सारासार विचार नाही
समितीने पुरंदरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना सारासार विचार केला आहे का? या नियुक्तीमागे पक्षीय राजकारणाची शक्यताही नाकारता येत नाही. तटस्थपणे विचार केला नसल्याने हा वाद उफाळला आहे. आता तरी शासनाने आपले मौन सोडले पाहिजे.
- रामदास भटकळ, साहित्यिक
विरोध करणे चुकीचे
इतिहास लेखनात रोमँटिक हिस्ट्री आणि सीरिअस हिस्ट्री असे प्रकार असतात. त्यामुळे ‘इतिहासकार’ या गटात शिवशाहीर मोडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून माझ्यासह अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात काही गैर नाही. विरोध करणे चुकीचे आहे.
- अरुण टिकेकर, साहित्यिक-ज्येष्ठ पत्रकार

सरकारने पुरंदरेंचा पुरस्कार रद्द करावा - विखे पाटील
बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जनतेचा विरोध पाहता राज्य सरकारने रद्द करावा. पुरंदरे यांनी जो इतिहास लिहिला, तो नेहमीच वादग्रस्त ठरला. यात शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जाईल, असा उल्लेख केला गेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन आजपर्यंत कोणताही वाद झाला नाही, मात्र पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा सर्वच स्तरांतून विरोध दर्शवला जात आहे. हा या पुरस्काराचा अवमान आहे. जोपर्यंत आरोपाचे खंडन होत नाही तोपर्यंत पुरंदरे यांनी हा पुरस्कार स्वीकारू नये.

बाळासाहेब विखेंचाही विरोध
बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारने स्थगित ठेवावा अथवा यावरून निर्माण झालेल्या वादातून तोडगा काढण्यासाठी मार्ग काढावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केली.

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बाबासाहेब पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. याात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे. त्यामुळे या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्थगित ठेवावा, असे परखड मत शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.

(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Only 250 invited to 'Maharashtra Bhushan' program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.