राज्यभरात अवघ्या २९ हजार परवान्यांचे नूतनीकरण
By admin | Published: December 19, 2015 02:20 AM2015-12-19T02:20:00+5:302015-12-19T02:20:00+5:30
विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. परवाना नूतनीकरणाला चार वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही अवघ्या २९ हजार ४५0 रिक्षा परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणास्तव रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर तब्बल चार वेळा मुदतवाढ नूतनीकरणासाठी देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही परिवहन विभागाच्या आवाहनाला मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ डिसेंबरपर्यंत २९ हजार ४५0 परवान्यांचेच नूतनीकरण झाले. या नूतनीकरणासाठी सहमत शुल्क आकारण्यात आल्याने यातून एकूण ४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. शेवटची मुदतवाढ देतानाच नूतनीकरण करण्यात येणारे परवाने कायमचे रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवाना फेरवाटपाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून वाढीव मुदतीत ज्यांनी परवाना नूतनीकरण केले नाही, तसेच यापूर्वी ज्यांनी रिक्षा परवाना धारण केला आहे अशा परवानाधारकांना प्रस्तावित लॉटरी प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते.
अंतिम मुदत संपली
३१ आॅक्टोबरपर्यंत परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर आणि पुन्हा ३0 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.