केवळ ३० ते ४० टक्के बार, रेस्टॉरंट होणार सुरू; ‘आहार’ची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:26 AM2020-10-04T04:26:07+5:302020-10-04T06:55:27+5:30
मुंबईत ३३ टक्के तर राज्यात ५० टक्के क्षमतेने बार, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल चाचणी करण्यासह खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्य सरकारने सोमवार, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण कामगार अद्याप आले नाहीत तसेच अनेक रेस्टॉरंट आणि बारचे भाडे थकल्याने रेस्टॉरंट सुरू करता येणार नाहीत. सोमवारी राज्यातील केवळ ३० ते ४० टक्के बार आणि रेस्टॉरंट सुरू होतील, अशी माहिती ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.
मुंबईत ३३ टक्के तर राज्यात ५० टक्के क्षमतेने बार, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल चाचणी करण्यासह खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
याबाबत शिवानंद शेट्टी म्हणाले, एकूण कामगारांपैकी ७० टक्के कामगार स्थलांतरित आहेत. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तर काही जणांना मालकाशी रेस्टॉरंटच्या थकलेल्या भाड्याबाबत तडजोड झाली तरच त्यांना सुरू करता येणार आहे. अन्यथा ते बंद राहतील.
...तर परवाना रद्द होणार!
मुंबईत रेस्टॉरंट, बार ३३ टक्के क्षमतेवर सुरू करण्यास परवानगी आहे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तीन फुटांचे अंतर ठेवणे, जागेचे निर्जंतुकीकरण, स्क्रीनिंग बंधनकारक आहे. नियम मोडल्यास परवाना रद्द करणे, दंड वसूल करणार असल्याची माहिती मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
टेबल रिकामा असेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्याचे काटेकोर पालन करणार आहोत. ग्राहक आल्यानंतर त्याचे तापमान तपासले जाईल. त्याला सॅनिटायजर दिले जाईल. टेबलमध्ये अंतर ठेवले जाईल. ग्राहक गेल्यानंतर त्या टेबलचे निर्जंतुकीकरण केले जाईल. मीठ, सॉस आदी वस्तू पूर्वी टेबलवर ठेवण्यात येत होत्या. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेबल रिकामा असेल.
- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार
खानपानाशिवाय इतर वेळी मास्क गरजेचा
गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना आधी नोंदणी करावी लागेल.
ग्राहकांची थर्मल गन किंवा आॅक्सि मीटरने तपासणी होईल. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा. फिजिकल डिस्टन्सिंग गरजेचे.
खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक
रेस्टॉरंटमध्ये सातत्याने निर्जंतुकीकरण करावे लागेल.
जेवण रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहात तयार केलेले असावे.
फूड डिलिव्हरी करताना ग्राहकांच्या हातात न देता दरवाजाजवळ ठेवावे.
काऊंटरवर कॅशिअर, ग्राहकांत शक्यतो ‘प्लेक्सिग्लास स्क्रीन’ असावे.