विद्यार्थी व्हिसासाठी केवळ ३० टक्केच महिला अर्जदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 04:42 AM2017-06-09T04:42:08+5:302017-06-09T04:42:08+5:30
अमेरिकेतील साडेचार हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकेतील साडेचार हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. भारत आणि चीनमधील विद्यार्थी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात येत आहेत; परंतु भारतातून विद्यार्थी व्हिसासाठी
अर्ज करणाऱ्यामध्ये महिलांचे प्रमाण केवळ ३० टक्क्यांपर्यंतच आहे. वस्तुत: अमेरिकेत मुलांइतक्याच शिक्षण आणि करिअरच्या संधी मुलींनाही उपलब्ध आहेत. तरीही ७० टक्क्यांहून अधिक अर्ज पुरुषांकडूनच यावेत, हे अचंबित करणारे आहे, असे मत मुंबईतील अमेरिकी दूतावासातील काऊन्सेलर चिफ मायकल इवान्स यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.८ जून हा दिवस देशभरातील अमेरिकी दूतावासांमध्ये ‘विद्यार्थी व्हिसा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभरातील पाचही दूतावासांमध्ये केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांना व्हिसा दिले जातात. त्यानिमित्त गुरुवारी मुंबईतील दूतावासात सुमारे तेराशे व्हिसा इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी मायकल इवान्स, दूतावासातील उपमुख्य अधिकारी जेनिफर लार्सन, युनायटेड स्टेट्स - इंडिया इज्युकेशनल फाउंडेशनचे विभागीय अधिकारी रायन परेरा आणि अमेरिकेत शिक्षण घेणारे काही भारतीय विद्यार्थी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मॉडेल आणि सूत्रसंचालिका लिझा मंगलदास हिने या वेळी तिचे अमेरिकेतील शिक्षणादरम्यानचे अनुभव कथन केले. कोलंबियामध्ये शिकताना खऱ्या अर्थाने जगाची कवाडे आपल्यासाठी उघडली गेल्याचे ती म्हणाली.
विद्यापीठांमधील विविधता आणि दर्जा अधिक उंचाविण्यासाठी अमेरिका जगभरातील विद्यार्थ्यांचे कायमच स्वागत करते, असे या वेळी जेनिफर म्हणाल्या. ‘अमेरिकेत कलागुणांच्या विकासाला पूर्णत: वाव आहे. केवळ बँक बॅलेन्स, भाषा कौशल्य अशा गोष्टी पाहून शैक्षणिक व्हिसा देत नाही. त्याऐवजी आत्मविश्वास, शिक्षणाची ऊर्मी आणि प्रामाणिकपणा याच गोष्टी मुलाखतीदरम्यान तपासून पाहतो. कोणत्याही अनावश्यक कारणासाठी व्हिसा नाकारणे, अडवून ठेवणे असे आमच्याकडून कधीही होत नाही. त्यातही काही कारणाने व्हिसा नाकारला गेलाच, तर पुन्हा अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुलाखतीला येताना कोणतेच दडपण घेऊ नये, असे मायकल यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुंबईतील रुईया महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला मूळचा सोलापूरचा नचिकेत थोरात सध्या अमेरिकेतील टोलेडो विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे शिक्षणाचा फारसा आर्थिक भार पडत नसल्याचे तो सांगतो. तो विद्यपीठाच्या टेबल टेनिस टीममध्ये आहे. तेथील शिक्षण पद्धतीत फारच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला वाव मिळत असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.