Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:40 AM2021-03-03T04:40:53+5:302021-03-03T04:41:28+5:30
राज्याला लसीच्या साठ्याची वाढती गरज : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीचे केवळ ४४ लाख डोस उपलब्ध आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने सुमारे १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यामुळे लसीच्या आणखी साठ्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने वेळेवर लसींची उपलब्धता न केल्यास लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्यात आता नुकतेच सरकारने ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराचे रुग्ण आणि ६० हून अधिक वय तसेच सहव्याधी असणाऱ्या सुमारे १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. याविषयी, राज्याच्या लसीकरण प्रक्रियेचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले की, खासगी आणि सरकारी-पालिका अशा तिन्ही स्तरांवरील वैद्यकीय संस्थांमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात या प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने केंद्राकडून लसीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आहे त्या डोसची उपलब्धता आणि वितरण यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, ७ मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण अधिक वेगाने राबविण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे यासाठी केंद्राकडून लसीच्या उपलब्धतेसाठी मागणी करणे गरजेचे आहे. तर लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनीही केंद्राकडे वेळेवर लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. सध्या कोविशिल्डचे ३९.८४ लाख डोस आणि कोव्हॅक्सिनचे ४.८ लाख डोस आहेत.
राज्यात काेराेनाचे ७९०९३ सक्रिय रुग्ण संख्या
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. मंगळवारी राज्यात ७८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७९०९३ एवढी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ५४ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुंबईत ८४९, नागपूर ८०९, पुण्यात ७०३, अमरावती ४८३ एवढे नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.