ठाणेकरांसाठी फक्त ५ फायलेरिया निरीक्षक

By admin | Published: December 4, 2014 02:45 AM2014-12-04T02:45:26+5:302014-12-04T02:45:26+5:30

राज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना,

Only 5 felaria inspectors for Thanekar | ठाणेकरांसाठी फक्त ५ फायलेरिया निरीक्षक

ठाणेकरांसाठी फक्त ५ फायलेरिया निरीक्षक

Next

अजय महाडिक, मुंबई
राज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना, या आजारांचा फैलाव प्रतिबंधित कारणाऱ्या फायलेरिया विभागाच्या भरतीचे घोंगडे ठाणे महानगरपालिकेने १९९१पासून भिजत ठेवले आहे.
२०११च्या जनगणनेनुसार १८ लाख १८ हजार ८७२ लोकसंख्येच्या या शहरात डेंग्यू रोखण्यासाठी फक्त २३५ कर्मचारी कागदावर दिसतात. ५० हजार नागरिकांमागे १ फायलेरिया निरीक्षक असे स्पष्ट शासकीय धोरण असतानाही त्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या विभागाकडे अद्याप स्वतंत्र अर्थसंकल्प नसून कायम कर्मचाऱ्यांचे पगार वगळता वारंवार आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अर्थसंकल्पातून हा खर्च भागवण्यात येतो, हे विशेष!
ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी वेगळा कर्मचारीवर्ग नेमणे व त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असणे याबाबत वारंवार विभागीय स्तरावर मागणी होत आहे. तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या कारकिर्दीत फायलेरिया विभागात अत्यावश्यक म्हणून २६९ रिक्त पदांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र सदर भरती प्रस्ताव ‘अनावश्यक’ या शेऱ्यासह परत पाठविण्यात आला. सध्या या प्रस्तावाची फाईल आस्थापना विभागात पडून आहे.
शासनाच्या धोरणानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या फायलेरिया विभागात २३५ कर्मचारी वगळता २६९ पदे भरणे आवश्यक असल्याचा ताळेबंद आस्थापना विभागाकडे आहे. यात ३१ फायलेरिया निरीक्षक, ३६ वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, २८ कीटक समाहक, १७४ क्षेत्र कार्यकर्ता या पदांचा अंतर्भाव आहे. या सर्व पदांवर नेमणूक झाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला २,५२,७९,५०० रुपये (कोटी) एवढा बोजा अपेक्षित आहे. १८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा गावगाडा हाकताना महापालिकेच्या फायलेरिया विभागाला वर्ष २०१२पर्यंत दरवर्षी कंत्राटी कामगार घ्यावे लागत होते. त्यानंतर आवश्यकता म्हणून ५० सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे, मात्र फायलेरिया विभागातीलच काही कर्मचारी इतर विभागांत वळते केल्याचेही वास्तव आहे.

Web Title: Only 5 felaria inspectors for Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.