आतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:11 AM2020-08-10T02:11:13+5:302020-08-10T06:48:57+5:30
जिल्हा बँकांची मात्र भूमिपुत्रांना चांगली साथ
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्त इशारा देऊनही राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्जवाटप करण्यासंदर्भात आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्याने आतापर्यंत राज्यातील केवळ ५० टक्केच शेतकºयांना खरीप हंगामाचे कृषीकर्ज वाटप होऊ शकले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मात्र तत्परता दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले
आहे.
खरीप हंगामाचे कर्जवाटप १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. मात्र, पिकांचा हंगाम लक्षात घेता बहुतांश पीकवाटप हे जुलैअखेर करणे अपेक्षित असते. आज ९ ऑगस्ट आला तरी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम पडलेली नाही.
यंदा व्यापारी बँकांना ३२ हजार ५१७ कोटी रु.कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील केवळ ११ हजार १९६ कोटी रुपयांचे म्हणजे ३४.४३ टक्केच वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी ११ हजार ५७४ कोटी रुपयांचे म्हणजे ८७.२२ टक्के कर्जवाटप केले. जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी एकत्रितपणे केलेल्या कर्जवाटपाची टक्केवारी ५० आहे पण त्यात सिंहाचा वाटा हा जिल्हा बँकांचा आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापारी बँकांना कर्जवाटप वाढविण्याच्या स्पष्ट सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. तसेच त्यांनी कर्जवाटपात मागे असलेल्या १४ जिल्हा बँकांची अलिकडेच बैठक घेतली.
गेल्या वर्षीपेक्षा ८ लाख शेतकरी संख्या वाढली
कर्जवाटपाचे ५० टक्केच उद्दिष्ट साध्य झाले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६ हजाराने वाढली आहे. यंदा आतापर्यंत जिल्हा बँकांनी २१.३३ लाख शेतकºयांना तर व्यापारी बँकांनी ८.८७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जवाटप केले. गेल्यावर्षी आतापर्यंत २२ लाख १४ हजार शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते.