एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:37 IST2025-03-24T10:13:50+5:302025-03-24T10:37:56+5:30
कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Shiv Sena Aditya Thackeray: कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका गाण्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कामरा याचा कॉमेडी शो जिथे झाला त्या सेटची या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "कॉमेडियन कुणाल कामरा याने जिथं गाणं सादर केलं होतं त्या कॉमेडी शोच्या सेटची मिंधेंच्या घाबरट गँगने तोडफोड केली. मुळात हे गाणं १०० टक्के सत्य होतं. फक्त एखादा घाबरट व्यक्तीच एखाद्याच्या गाण्यावर अशा पद्धतीचे कृत्य करू शकतो. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचं काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, "ही तोडफोड म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा एकनाथ शिंदेंनी केलेला हा आणखी एक प्रयत्न आहे," असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Mindhe’s coward gang breaks the comedy show stage where comedian @kunalkamra88 put out a song on eknath mindhe which was 100% true.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 23, 2025
Only an insecure coward would react to a song by someone.
Btw law and order in the state?
Another attempt to undermine the CM and Home Minister…
कुणाल कामरा गायब?
एकनाथ शिंदेंवरील गाण्याने वादंग निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून कुणाल कामरा याचा फोन बंद आहे. युवासेनेच्या राहुल कनाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कामरा याचा शोध सुरू असल्याचे समजते.