घोलप, पावशे यांचे एकमेव अर्ज
By admin | Published: April 4, 2017 04:30 AM2017-04-04T04:30:11+5:302017-04-04T04:30:11+5:30
सभापतीपदासाठी सेनेचे सदस्य संजय पावशे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी महापालिकेचे सचिव संजय जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.
कल्याण : केडीएमसीच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप, तर परिवहन समिती सभापतीपदासाठी सेनेचे सदस्य संजय पावशे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी महापालिकेचे सचिव संजय जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. दोन्ही समित्यांच्या सभापतीपदासाठी त्यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी होईल. दरम्यान, या दोन्ही समित्यांचे सभापतीपद शिवसेनेकडे राहणार असल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.
शिक्षण समितीच्या मागील निवडणुकीच्या वेळेस वैजयंती घोलप यांना सभापतीपद दिले जाणार होते. मात्र, निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या वाटाघाटीत समितीचे पहिले सभापतीपद भाजपाच्या वाट्याला गेले. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. यंदा सभापतीपदासाठी त्या प्रमुख दावेदार असल्याने त्यांना संधी देण्यात आली. सोमवारी त्यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी होईल.
दुसरीकडे परिवहन समिती सभापतीपदाची यंदाची टर्म भाजपाची होती. परंतु, त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद बहाल केल्याने परिवहनचे सभापतीपद शिवसेनेकडेच राहण्याची दाट शक्यता होती. त्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचे पावशे यांना उमेदवारी देण्यात आली. सोमवारी त्यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. त्याचीही अधिकृत घोषणा बुधवारी निवडणुकीच्या वेळी होईल.
दरम्यान, या दोन्ही निवडणुका दुपारी ३.३० व ४ वाजता होतील. त्याला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
>पोटनिवडणुकीसाठी शेलार बंधूंचे चार अर्ज
केडीएमसीच्या कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी साई आणि सिद्धार्थ या दोघा सख्ख्या शेलार बंधूंनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, सिद्धार्थ यांच्याकडून अर्जमाघारीची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ७ एप्रिलला बिनविरोध निवडीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कांचनगाव-खंबाळपाड्याचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे निधन झाल्याने त्यांच्या प्रभागात १९ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शेलार कुटुंबातील शिवाजी यांचे सुपुत्र स्नेहल ऊर्फ साई शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. रविवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी शेलार कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु, सोमवारी साई यांचे बंधू सिद्धार्थ यांनीही उमेदवारी अर्ज भरले. या दोघा बंधूंनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सिद्धार्थ यांनी डमी अर्ज भरला आहे. बुधवारी चारही अर्जांची छाननी होईल. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्या दिवशीच साई यांच्या बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा २१ एप्रिलला होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, दिवंगत नगरसेवक शिवाजी यांचे ज्येष्ठ बंधू गंगाराम शेलार यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचाही निवडणूक
न लढवण्याचा निर्णय
काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे यांनीदेखील सोमवारी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा केणे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे आम्हीही खंबाळपाडा प्रभागात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.