नवी मुंबई राज्यातील एकमेव स्वच्छ शहर

By Admin | Published: August 9, 2015 12:43 AM2015-08-09T00:43:16+5:302015-08-09T00:43:16+5:30

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

The only clean city in the state of Navi Mumbai | नवी मुंबई राज्यातील एकमेव स्वच्छ शहर

नवी मुंबई राज्यातील एकमेव स्वच्छ शहर

googlenewsNext

नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील शंभर शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर स्वच्छतेच्या यादीतील हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.
केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशाची चाचपणी करण्यासाठी देशातील ४७६ शहरांची पाहणी केली. या पाहणीनंतर टॉप १०० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नवी मुंबई हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील हे एकमेव शहर ठरले आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी-सुविधांचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रशस्त रस्ते, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक यंत्रणा, दैनंदिन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणी, चोवीस तास पाणीपुरवठा आदी सुविधांची देशपातळीवर वारंवार दखल घेतली गेली आहे.
इतकेच नव्हे, तर आतापर्यंत विविध पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी
मुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमासाठी निवडक १० शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरे व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे.
देशातील १०० टॉप स्वच्छ शहरांची निवड करताना केंद्रीय विकास मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक सेवा तसेच तेथील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याचे व्यवस्थापन, सरकारी इमारती व परिसराची स्वच्छता आदींची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीतील शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली.
या सर्व निकषात नवी मुंबई महापालिकेने बाजी मारली. दरम्यान, देशातील तिसऱ्या व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे. समस्त नवी मुंबईकरांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

अव्वल ठरलेली दहा शहरे
स्वच्छतेच्या बाबतीत म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तामिळनाडू), नवी मुंबई (महाराष्ट्र), कोची (केरळ), हसन (कर्नाटक), मंड्या (कर्नाटक), बेंगळुरू (कर्नाटक), तिरुअनंतपुरम (केरळ), हलीसाहर (पश्चिम बंगाल) आणि गंगटोक (सिक्कीम) ही दहा शहरे देशात अव्वल ठरली आहेत.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत बेंगळुरूने शहरांच्या राजधानी गटात तर म्हैसूरने अन्य शहरांच्या गटात अव्वल स्थान पटकाविले आहे. पश्चिम बंगालच्या २५ शहरांनी या टॉप १०० मध्ये स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबई हे एकमेव शहर या यादीत समाविष्ट झाले आहे.

Web Title: The only clean city in the state of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.