सरसकट कर्जमाफी हाच एकमेव निकष : पवारांनी केले घोषणेचे विश्लेषण
By Admin | Published: June 11, 2017 10:01 PM2017-06-11T22:01:17+5:302017-06-11T22:01:17+5:30
राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11 - राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे काळजी वाटते. कर्जमाफीसाठी एकच निकष असावा ते म्हणजे सरसकट कर्जमाफी. निकष, तत्वत: याचे विश्लेषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता येऊ नये. घोषणेतील तत्वत: आणि निकष या दोन शब्दांवरून माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. सातबारा कोरा करण्यासाठी शासनाने तातडीने महसूल विभागाला आदेशित करण्याची मागणी करीत त्यांनी शासन व सुकाणू समितीचे अभिनंदन केले. सरकारच्या घोषणेच्या अंमलबजावणीवर सुकाणू समितीने, शेतकऱ्यांनी, संघटनांनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आ.सतीश चव्हाण, अमरसिंंह पंडीत, भाऊसााहेब चिकटगांवर, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती.
पावसाळा लागला आहे, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी नवीन कर्जासाठी सहकारी सोसाट्यांकडे जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे. भरपूर शेती उत्पादन घेण्याचे आवाहन करीत माजीमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती. सरकारने काय निर्णय घेतला आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक संप झाला. सर्व शेतकरी संघटना, नेत्यांची एकजुट यामुळे झाली. हे शेतकरी आंदोलनाचे यश आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना लाभ मिळतो. परंतु मराठवाडा, विदर्भ व इतर सर्व भाग हे राज्याचे आहेत. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ सर्वांना असा होतो हे मला लहानपासून कळते. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलतांना सांगितले. सरकारने निर्णय घेतला म्हणजे आर्थिक तरतूदीचा विचार केलाच असेल. डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, हमीभावाची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आणखी समाधानी होतील.
राजकीय भूकंप त्यांनाच माहिती
राजकीय भूकंपाचे वक्तव्य शिवसेनेच्या मुखपत्राने केले आहे. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदूही तेथेच असेल. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. भूकंपांच्या मागील निश्चित कारणे त्यांनाच माहिती असतील. पंतप्रधानाची भेट आणि त्यानंतर कर्जमाफीचा सरकारचा निर्णय, यामागे पवार आहेत काय? माझ्या भेटीमुळे नाही, तर शेतकरी आणि सुकाणू समितीचे हे यश आहे. असे पवारांनी स्पष्ट केले.