कोठारी कंपाऊंडला केवळ तारीख पे तारीख, पालिका बजावतेय केवळ नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:41 PM2017-10-05T16:41:54+5:302017-10-05T16:42:18+5:30
एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे.
ठाणे - एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे. नोटिसा बजावण्यापलिकडे पालिकेने अद्याप येथील बांधकामांवर हातोडा टाकलेला नाही. आता पुन्हा एका आठवड्याची मुदत दिली असून, केवळ तारीख पे तारीखचाच खेळ सुरू आहे. त्यात येत्या 13 ऑक्टोबरला पुन्हा महासभा लावण्यात आली आहे. परंतु कारवाई झाली नाही तर महासभा होणार का? असा प्रश्न मात्र राहणारच आहे.
कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरुन मागील महिन्यात महापौरांनी महासभा तहकूब केली होती. त्यानंतर आता पुन्हा येत्या 13 ऑक्टोबर रोजी तीच महासभा लावण्यात आली आहे. परंतु यावेळेस महापौर आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान शहरातील इतर ठिकाणी कारवाई करताना पालिकेने नोटीस बजावली नव्हती. हा मुद्दा महासभेत देखील गाजला होता. त्यानंतरही पालिकेने कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे काम केले आहे.
दुसरीकडे तसेच यापूर्वी कारवाई होऊनही पुन्हा एकदा सुरू झालेल्या शहरातील अनधिकृत लेडीज बारवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. परंतु या खेपेला देखील पालिकेने संबंधिताना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नाही. थेट कारवाई केली. याचाच अर्थ एकाला एक न्याय आणि दुस-या एक न्याय अशी भूमिका पालिकेकडून घेत जात असल्याचा आरोप आता या मंडळींनी केला आहे. आतापर्यंत शहरातील सहा बारवर महापालिकेने कारवाई केली आहे. अनधिकृत लेडीज बारवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेले दिली आहे. या कारवाईपूर्वी कोठारी कंपाऊंडमधील सुरू असलेल्या सर्वच अनधिकृत हुक्का पार्लर, पबला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कोठारी कंपाऊंडच्या निमित्ताने महासभेत उठलेले वादळ शांत करण्यासाठी सर्वसाधारण सभेनंतर पालिका आयुक्त आणि राजकीय पदाधिका-यांची एक महत्वाची बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीनंतर प्रथम 20 सप्टेंबर रोजी 26 व्यावसायिकांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुस-यांदा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस 100 हून अधिक व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोठारी कंपाउंड मधील व्यावसायिकांनी महापालिकेच्या या कारवाईलाच आव्हान दिले होते. त्यानंतरही पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पुन्हा एकदा नव्याने नोटीस दिल्या आहेत. उपायुक्त स्तरावरील तसेच फायर ब्रिगेडच्या नोटिसा असून, पुन्हा एकदा या व्यावसायिकांना त्यांच्या बचावासाठी कालावधी देण्यात आला आहे. नोटीस बजावल्यानंतर किती व्यावसायिकांनी आपले म्हणणे मांडले आहे, याची माहितीही सहाय्यक आयुक्तांकडे उपलब्ध नाही. कोठारी कंपाउंड संदर्भातील कोणत्याही प्रकारचा निर्णय माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून घेण्यात येत नसून पालिका मुख्यालयातूनच कार्यवाही करण्यात येत आहे.
इतर अनधिकृत बार आणि लॉजवर नोटीस न देता कारवाई करणा-या महापालिकेने कोठारी कंपाउंडमधील व्यावसायिकांना केवळ नोटीस देण्याचा फार्स केला आहे. कोठारी कंपाउंडवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई होईल, असे आश्वासन महापौरांना सभागृहात देणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोठारी कंपाउंडवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.