ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

By admin | Published: July 1, 2016 08:45 PM2016-07-01T20:45:21+5:302016-07-01T20:45:21+5:30

महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे.

Only development of rural areas - development of Maharashtra - Arun Bongirwar | ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

Next

मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेवूनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील आणि उन्नतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली, असे बोंगिरवार यांनी सांगितले.
सामाईक कृषी पुरस्कारासह एकूण १२ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाईक कृषी पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर, उर्वरीत ११ विभागांसाठी २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
मान्यवरांची अनुपस्थिती
दरवर्षी मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कृषी पुरस्कारांचे वितरण होते. यंदा मात्र सर्वच बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

यंदाचे विविध विभागातील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार पुढीलप्रमाणे :
सामाईक पुरस्कार (उगम फाऊंडेशन, कायर्वाह- भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषि पुरस्कार ( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार ( संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अ‍ॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन ( उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन ( दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार ( वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू ,जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार ( लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)

Web Title: Only development of rural areas - development of Maharashtra - Arun Bongirwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.