रेल्वेच्या डब्यात सोडली अवघ्या आठ दिवसाची चिमुकली, परभणीत समोर आला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 06:26 PM2017-10-15T18:26:32+5:302017-10-15T18:29:13+5:30
हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़.
परभणी, दि. १५ : हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़.
हैदराबाद-पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे गाडी शनिवारी सायंकाळी ८ च्या सुमारास गंगाखेडकडून परभणीकडे येत होती. यावेळी रेल्वेतील एका कोचमध्ये दोन सीटच्यामध्ये कपड्याची झोळी करून त्यात एक स्त्री जातीचे अर्भक ठेवलेले होते़. गाडी सिंगणापूरजवळ आल्यानंतर बेवारस स्थितीत असलेल्या या अर्भकाची माहिती काही सतर्क प्रवाशांना होताच त्यांनी ही माहिती रेल्वे कर्मचा-यांना दिली़. त्यानंतर परभणीच्या रेल्वे स्टेशन प्रबंधकांना अर्भकासंदर्भात माहिती देण्यात आली़.
रेल्वे गाडी परभणी स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलीस फोर्सच्या कर्मचा-यांनी या अर्भकास ताब्यात घेतले व चाईल्ड लाईनच्या पथकाला पाचारण केले़. रेल्वे पोलीस बलाचे निरीक्षक उपाध्याय, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे, सय्यद इशरद, कृष्णा फुलारी आदींनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले़. आठ दिवसांच्या या चिमुकलीची प्रकृती ठणठणीत आहे व ती सुरक्षित असल्याचे चाईल्ड लाईनचे संदीप बेंडसुरे यांनी सांगितले़. या प्रकरणी अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.