एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

By Admin | Published: February 20, 2017 01:28 AM2017-02-20T01:28:09+5:302017-02-20T01:28:09+5:30

देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना

Only the Emelich of the monopoly power! | एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

googlenewsNext

राजा माने
सोलापूर : देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना येथे होत असलेली महापालिकेची निवडणूकही शहराच्या राजकारणाला नवी ओळख देण्याच्या तयारीला लागली आहे. संपूर्ण राज्याला लागणाऱ्या शालेय गणवेशात तब्बल ५० टक्के वाटा उचलणाऱ्या या ‘गारमेंट व युनिफॉर्म हब’चे प्रश्न जसे वेगळे आहेत तसे इथल्या मतदारांची मानसिकताही कमालीची वैविध्यपूर्ण आहे. जात आणि नात्या-गोत्यांच्या पारंपरिक विषयांबरोबरच येथे भाषा, रहिवासाचा भाग आणि उदरनिर्वाहाच्या साधनांचाही परिणाम होतो. त्याच परिणामाचा लाभ साधण्याचे कौशल्य कोण प्राप्त करतो यावरच त्याचे विजयाचे गणित ठरते.
तसे वर्षानुवर्षे सोलापूर शहराचे राजकारण शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या इशाऱ्यावरच चालायचे. जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाकडे डोळेझाक करण्याच्या अलिखित करारावर तसे सोलापूरचे राजकारण आणि निर्णय पवारांनीही शिंदेंच्याच हवाली केलेले होते. शिंदेंचे विश्वासू स्व. विष्णुपंत तथा तात्या कोठे हे ‘शॅडो शिंदे’ न्यायाने शहराचे राजकारण हाताळत असायचे. काळाच्या महिम्याने शिंदेंच्या कन्या प्रणिती आणि कोठेंचे चिरंजीव महेश यांच्यातील राजकीय संघर्षाने गणित बिघडले आणि कोठे परिवार शिंदे विरोधक बनला. पुढे तात्यांच्या निधनानंतर कोठे परिवाराचा शिंदेविरोधी संघर्ष अधिकच तीव्र झाला आणि कोठे परिवार शिवसेनानिवासी झाला. हा संदर्भ काँग्रेसच्या या निवडणुकीतील राजकारणात किती रंग भरणार हे निकालच ठरवेल.
आ. प्रणिती शिंदे यांनी स्वत:च्या शैलीत आक्रमक पद्धतीने केलेली शहराच्या राजकारणाची मांडणी, त्याला सुशीलकुमार शिंदे यांच्या पारंपरिक मुरब्बी राजकारणाची मिळणारी जोड हीच काँग्रेसची जमेची बाजू आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे मार्केटिंग करण्याचा नारा देत शहरात भाजप संघटन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची पारंपरिक लिंगायत व्होट बँक आहे. तिला इतर जातीने विस्तारित करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. महेश कोठे-देवेंद्र कोठे परिवाराची व्होट बँक या मुद्दलावर शिवसेनेने आव्हान निर्माण केले आहे. कामगार चळवळीच्या प्रामाणिक बळावर कॉ. नरसय्या आडम मास्तर संघर्षाला सज्ज झाले आहेत. एमआयएम पक्षाची नक्की ताकद किती याचा अंदाज अनेक जण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्याच गर्दीने ग्रासला आहे.आरपीआय (आ)चे नूतन प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, रिपाइं (गवई)चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, रिपाइं (पीजी)चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड, पीरिप (कवाडे) प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे आणि बसपाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड.संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे यांच्या माध्यमातून आंबेडकरी मते कोण कशी खेचते हेही महत्त्वाचे ठरेल.
शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण आणि त्यांची टीम कोठेंच्या शक्तीत कशी भर टाकणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी दोन देशमुख आणि खा.शरद बनसोडे यांची मोट बांधून पक्षाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

स्मार्ट प्रश्नांची निवडणूक
शहरातल्या गलिच्छ वस्त्या, नागरी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची ओरड यावर जुजबी मलमपट्टी करणारा प्रचार सगळीकडे दिसतो. सर्वच राजकीय पक्ष स्मार्ट प्रश्नांवर आणि स्मार्ट सिटीवर मोठमोठी आश्वासने देऊन मतदारांची स्वप्ने रंगविताना दिसतात.

Web Title: Only the Emelich of the monopoly power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.